हायकोर्ट बारमध्ये खुर्च्यांवरून ‘वॉर’
By admin | Published: April 22, 2017 03:09 AM2017-04-22T03:09:59+5:302017-04-22T03:09:59+5:30
हायकोर्ट बारमध्ये खुर्च्या वाटपावरून वादाचा भडका उडाला आहे. काही सदस्यांनी बसण्यासाठी खुर्च्या मिळाल्या नसल्यामुळे,
वाटपावर आक्षेप : जुन्या कार्यकारिणीच्या निर्णयावर रोष
नागपूर : हायकोर्ट बारमध्ये खुर्च्या वाटपावरून वादाचा भडका उडाला आहे. काही सदस्यांनी बसण्यासाठी खुर्च्या मिळाल्या नसल्यामुळे, काही सदस्यांनी खुर्च्या काढून घेण्यात आल्यामुळे तर, काही सदस्यांनी बसण्याची जागा बदलविण्यात आल्यामुळे विरोध नोंदविण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी अनेकांनी हायकोर्ट बार असोसिएशनकडे लिखित आक्षेप कळविले आहेत.
खुर्च्यांच्या व्यवस्थेसंदर्भात जुन्या कार्यकारिणीने निर्णय घेतला आहे. हा निर्णय निवडणुकीनंतर घेण्यात आला. त्यामुळे निर्णय अवैध आहे, असे सदस्यांचे म्हणणे आहे. अॅड. उज्ज्वल फसाटे यांनी संघटनेला दिलेले निवेदन वृत्तपत्र प्रतिनिधींना मिळाले आहे. २०१५ मध्ये ५१ खुर्च्यांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. ३० हजार रुपये शुल्क घेऊन खुर्ची देण्यात येणार होती. त्यानुसार, फसाटे यांनी अर्ज व ३० हजार रुपयांचा धनादेश संघटनेकडे जमा केला. परंतु, तो धनादेश अद्याप वठविण्यात आला नाही.
जुन्या कार्यकारिणीने कार्यकाळ संपतपर्यंत खुर्च्या वाटपावर निर्णय घेतला नाही. कार्यकाळ संपल्यानंतर अवैधरीत्या खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. खुर्च्या वाटप करताना वरिष्ठता लक्षात घेण्यात आली नाही व निकषांचे पालन करण्यात आले नाही असे फसाटे यांनी सांगितले. नवीन कार्यकारिणी या वादावर कसा तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
सर्वांना जागा मिळेल
उच्च न्यायालयात वकिलांना बसण्यासाठी पुरेसी जागा नाही. त्यामुळे अनेक वकील स्थायी जागा वाटप होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. नवीन इमारतीचे काम पूर्ण होतपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या जागेत सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल.
- अॅड. अनिल किलोर, अध्यक्ष, हायकोर्ट बार असोसिएशन.