प्रवाशांच्या गर्दीवर 'वॉर रूम'मधून उतारा, प्रवाशांच्या समस्येचा तत्परतेने होणार निपटारा
By नरेश डोंगरे | Published: June 16, 2024 08:45 PM2024-06-16T20:45:38+5:302024-06-16T20:45:52+5:30
विभागीय व्यवस्थापकांचे राहिल 'वॉर रूम' वर लक्ष
नागपूर: रेल्वे प्रवाशांची वाढलेली गर्दी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी रेल्वेे प्रशासनाने 'वॉर रूम' निर्माण केली आहे. २४ तास सुरू राहणाऱ्या या वॉर रूम मधून प्रवाशांच्या प्रत्येक अडचणीला तात्काळ दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या चांगलीच वाढली आहे. अतिरिक्त गाड्या, अतिरिक्त कोच लावूनही गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे. अशात ठिकठिकाणी सुरू असलेल्या रेल्वेच्या विकास कामांमुळे गाड्यांना विलंब होण्याचे, गाड्या रद्द केल्या जाण्याचे प्रकारही सुरू आहे. त्यामुळे गर्दीत प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होते. त्यासंबंधाने तक्रारी आणि ओरडही होते. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि आरामदायी प्रवासाची अनुभूती देण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजनाही जाहिर केल्या जात असतात.
आता अशीच एक उपाययोजना रेल्वेने जाहिर केली आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्रवाशांच्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी एक वॉर रूम तयार करण्यात आली आहे, या रूममध्ये विद्युत विभाग, परिचालन विभाग, वाणिज्य विभाग आणि यांत्रिकी विभागाचे अधिकारी-कर्मचारी बसणार आहेत. ही वॉर रूम २४ तास कार्यरत राहणार असून कुठे कोणती समस्या किंवा अडचण आहे, त्याची माहिती किती वाजता मिळाली आणि ती अडचण किती वेळेत दूर करण्यात आली, त्यासंबंधीचा लेखाजोखा वॉर रूममधून वरिष्ठांना पाठविला जाणार आहे. रूमच्या कार्यप्रणालीवर मिनट टू मिनट विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल लक्ष ठेवणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
'मी तुम्हाला मदत करू शकतो
उपरोक्त उपाययोजना करतानाच रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी बूथ निर्माण करण्यात आले आहे. येथील कर्मचारी अडचण घेऊन येणाऱ्या प्रवाशांना 'मी तुम्हाला काय मदत करू शकतो, असा प्रश्न करून प्रवाशांची अडचण सोडविण्याचे प्रयत्न करणार आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेगाड्यांमध्ये तिकिट तपासणीस आणि आरपीएफची स्पेशल टीम तयार करण्यात आली असून, ही टीम स्लीपर तसेच जनरल कोचमध्ये गर्दी वाढणार नाही, याची काळजी घेणार आहे.