नागपूर जिल्ह्यातील वारंगा परिसर बर्ड फ्लू बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 11:44 PM2021-01-21T23:44:13+5:302021-01-21T23:46:38+5:30
Bird flu, nagpur news नागपूर जिल्ह्यातील मौजा वारंगा शिवारात एव्हियन इन्फ्लूएंझा(बर्ड फ्लू)मुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये, यासाठी वारंगा परिसर बर्ड फ्ल्यू बाधित आणि निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौजा वारंगा शिवारात एव्हियन इन्फ्लूएंझा(बर्ड फ्लू)मुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये, यासाठी वारंगा परिसर बर्ड फ्ल्यू बाधित आणि निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. वारंगा येथील बाधित कोंबड्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत.
प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम-२००९ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार नागपूर जिल्ह्यातील मौजा वारंगा शिवारातील संसर्ग केंद्रापासून एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र व १० किलोमीटर परिसर हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षी, कुक्कुट खाद्य आणि कुक्कुट पक्ष्यांचे खत यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, सर्व कुक्कुट आणि इतर पाळीव पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने शीघ्र कृती दलाने नष्ट करुन मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, कुक्कुट पक्ष्यांचे निवारे आणि इतर निगडित साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे यासाठी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी बाधित क्षेत्रात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.