मनपाचे इच्छूक संभ्रमात; प्रचार करावा तरी कसा व कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 02:04 PM2022-03-19T14:04:11+5:302022-03-19T14:28:01+5:30

महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतीतील प्रभागरचना रद्द करण्यात आली. उपरोक्त ठिकाणी प्रभाग रचना, हद्दी निश्चित करण्याची प्रक्रिया नव्याने करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे नागपूरसह अन्य महापालिकेच्या प्रभागरचना रद्द झाल्या आहेत.

Ward formation of Nagpur and other Municipal Corporations canceled, aspiring applicants are in confusion | मनपाचे इच्छूक संभ्रमात; प्रचार करावा तरी कसा व कुठे ?

मनपाचे इच्छूक संभ्रमात; प्रचार करावा तरी कसा व कुठे ?

Next
ठळक मुद्देप्रभाग एकचा की दोनचा : तयारीवर फेरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रभाग रचनेच्या हरकतींवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होण्याच्या प्रतीक्षेत असताना ही संपूर्ण प्रक्रिया रद्द झाल्यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नव्या प्रभागाबाबत संभ्रम असल्याने माजी नगरसेवक व इच्छुकांना प्रचार करावा तर कुठे असा प्रश्न पडला आहे.

नवीन प्रभाग रचना होणार असल्याने पुन्हा काही भागांची मोडतोड वा काही क्षेत्र कमी-अधिक होण्याची भीती आहे. परिणामी, मध्यंतरी जाहीर झालेल्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रचाराला लागलेले आजी-माजी नगरसेवक आणि इच्छुकांची चिंता वाढली आहे.

ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वत:कडे घेत शासनाने नव्याने प्रभाग रचना करण्याचे निश्चित केले. त्याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झाली आहे. महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतीतील प्रभागरचना रद्द करण्यात आली. उपरोक्त ठिकाणी प्रभाग रचना, हद्दी निश्चित करण्याची प्रक्रिया नव्याने करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे नागपूरसह अन्य महापालिकेच्या प्रभागरचना रद्द झाल्या आहेत.

शासनाच्या निर्णयानुसार यापूर्वी महापालिकेने तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला होता. फेब्रुवारीच्या प्रारंभी ५२ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर झाली होती. त्यावरील हरकती व सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल अशी स्थिती होती. सर्वसाधारणपणे प्रस्तावित रचनेत फारसे बदल होत नाहीत. त्यामुळे इच्छुकांनी प्रचार सुरू केला होता.

जनसंपर्काचा उपयोग होईलच याची शाश्वती नाही

तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. भेटीगाठी वाढवून जनसंपर्क सुरू केला होता. प्रभागात जनसंपर्क कार्यालये सुरू केली. मात्र प्रभाग रचना रद्द् झाल्यामुळे जनसंपर्काचा उपयोग होईल की नाही याची शाश्वती नसल्याने इच्छुकांचा उत्साह कमी झाला आहे.

प्रभागाबाबत संभ्रम

महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभागानुसार होणार होती. मात्र ही प्रक्रीया रद्द झाली आहे. आता निवडणूक एक सदस्यीय की दोन सदस्यीय प्रभागानुसार होणार याबाबत निश्चितता नाही. तर काहींच्या मते तीन सदस्यीय प्रभाग कायम राहणार असल्याने प्रभागाबाबत संभ्रम वाढला आहे.

Web Title: Ward formation of Nagpur and other Municipal Corporations canceled, aspiring applicants are in confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.