प्रभाग रचनेने वॉर्डात बिघाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:09 AM2021-09-26T04:09:32+5:302021-09-26T04:09:32+5:30
कळमेश्वर : नगर परिषदेच्या राजकीय सारिपाटावर आता पुन्हा नव्याने खेळी मांडावी लागत आहे. शासनाने ‘एक वाॅर्ड, एक नगरसेवक’ हा ...
कळमेश्वर : नगर परिषदेच्या राजकीय सारिपाटावर आता पुन्हा नव्याने खेळी मांडावी लागत आहे. शासनाने ‘एक वाॅर्ड, एक नगरसेवक’ हा निर्णय बदलून आता जुन्या पद्धतीनेच एका प्रभागात दोन सदस्य असा निर्णय घेतला आहे. यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी करणाऱ्या इच्छुकांना आता राजकीय पक्षाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. यामुळे इच्छुकांनी आतापर्यंतच्या केलेल्या तयारीवर पाणी फिरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिकेत सध्या ८ प्रभाग आहेत. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्यात आले होते, तर एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडण्यात आले होते. नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून झाली होती. तीत भाजपच्या स्मृती इखार विजयी झाल्या होत्या. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता पालिकेत आता भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी ८, तर शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत.
नवीन प्रभाग पद्धतीमुळे आगामी निवडणुकीत शहरातील प्रभाग रचना पूर्णतः बदलणार आहे. प्रभागासोबतच नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज आहे. प्रभागनिहाय आरक्षण, मतदार संख्या या बाबींची रचना निवडणुकीच्या चार महिने आधी होणार आहे. कळमेश्वर शहराच्या हद्दवाढीत ब्राह्मणीचा समावेश झाला. यानंतर येथे एक नगरसेवक निवडून आला होता. आता नव्याने प्रभागरचना होऊन कळमेश्वर-ब्राह्मणी अशी प्रभाग रचना होणार असल्याने यावेळी किती प्रभाग पडतात व किती नगरसेवक होतात याबाबत शहरात चर्चा सुरू आहे.
शहर विकासाचे काय?
थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांची बांधिलकी संपूर्ण शहरासोबत असते. त्यामुळे सर्वच भागात त्याला विकासकामे करावी लागतात. आता नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून होणार नसल्याने प्रभागातून निवडून आलेला नगरसेवक नगराध्यक्ष होईल. त्यामुळे विरोधकांच्या प्रभागात काम करण्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नेहमीच होत असतो. हा प्रकार यापुढेही झाल्यास शहर विकासाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.