वॉर्ड पद्धतीमुळे राजकीय समीकरणे बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:10 AM2021-08-27T04:10:24+5:302021-08-27T04:10:24+5:30
अपक्षांमुळे सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली : छोट्या पक्षांनाही संधी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन सदस्यीय वॉर्डानुसार महापालिका ...
अपक्षांमुळे सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली : छोट्या पक्षांनाही संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन सदस्यीय वॉर्डानुसार महापालिका निवडणुका होतील असे गृहीत धरून राजकीय पक्षांनी व्यूहरचना आखली होती. वॉर्ड पद्धतीमुळे त्यांचे मनसुबे अडचणीत आले आहेत. अपक्षांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
निवडणूक आयोगाने एक सदस्यीय वॉर्ड रचनेनुसार प्रारूप वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शुक्रवारपासून याला सुरुवात होत आहे. महापालिकेत सध्या ३८ प्रभाग असून, १५१ नगरसेवक आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नव्या प्रारूप आराखड्यात १५१ वॉर्ड राहतील. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार त्यात काही बदल होऊ शकतात.
प्रभाग रचनेसाठी २०११ च्या जणगणनेनुसार प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. गतवेळी मनपाची निवडणूक चार सदस्यीय प्रभागानुसार झाली. आकारमानामुळे ही प्रभागरचना उमेदवारांची दमछाक करणारी होती. काही राजकीय पक्षांनी या रचनेचा नियोजनपूर्वक लाभ उठविला. एक-दोन वजनदार उमेदवाराच्या जोडीला इतरांना निवडून आणले. आता त्यांना उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याची शक्यता आहे.
...
नागरिकांची नाराजी भोवणार
चार सदस्यीय प्रभागाचा विस्तार मोठा असल्याने काही कामासाठी नेमकी कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न नागरिकांना पडायचा. प्रभागातील चार नगरसेवकांतील अंतर्गत वादात नागरिकांना लहानसहान कामासाठी भटकंती करावी लागते. विकासही रखडला आहे. यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी असल्याने निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
...
ओबीसींना खुल्या प्रवर्गातून संधी
आगामी निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण नसेल. त्यामुळे सध्या या प्रवर्गातून नगरसेवक झालेल्या आणि आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्यांना खुल्या प्रभागातून लढावे लागेल.
...
अपक्षांची संख्या वाढणार
महापालिकेच्या मागील काही निवडणुकीवर नजर टाकल्यास एक सदस्यीय प्रभाग रचनेत अपक्षांची संख्या वाढल्याचे दिसून येते. २००७ ला वॉर्ड पद्धतीने निवडणूक झाली. त्यावेळी छोटे पक्ष आणि अपक्ष नगरसेवकांची संख्या २६ होती. २०१२ ला दोन सदस्यीय वॉर्ड निवडणुकीत छोटे पक्ष व अपक्ष नगरसेवकांची संख्या १८ होती. याचा विचार करता २०२२ च्या निवडणुकीत अपक्ष व छोट्या पक्षांच्या नगरसेवकांचा बोलबाला राहणार आहे.
...
लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४
अनुसूचित जाती ४ लाख ८० हजार ७५९
अनुसूचित जमाती १ लाख ८८ हजार ४४४
सध्याच्या एका प्रभागाची लोकसंख्या ४७ हजार ते ७१ हजार
....
तीन निवडणुकीत १५ जागा वाढल्या
२००७ मध्ये महापालिकेत १३६ नगरसेवक होते. २०१२ मध्ये नगरसेवकांची संख्या १४५ होती, तर २०१७ च्या निवडणुकीत १५१ झाली. लोकसंख्या वाढीसोबतच नगरसेवकांची संख्या वाढल्याने वाॅर्डाची रचना २००७ प्रमाणे न राहता यात बदल केला जाणार आहे.