वर्धा गर्भपात प्रकरण; अखेर आराेग्य विभागाचे चौकशी पथक आर्वीत; दीड तासाच्या अंतरावर ६० तासांनंतर पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 07:06 AM2022-01-16T07:06:00+5:302022-01-16T07:10:06+5:30
Wardha News आर्वी येथील गर्भपात प्रकरणात ‘लोकमत’ने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या संशयास्पद भूमिकेवर बोट ठेवल्याने राज्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी वर्धा येथील आरोग्य विभागाचे चौकशी पथक आर्वीत दाखल झाले.
नरेश डोंगरे
नागपूर : आर्वी येथील गर्भपात प्रकरणात ‘लोकमत’ने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या संशयास्पद भूमिकेवर बोट ठेवल्याने राज्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी वर्धा येथील आरोग्य विभागाचे चौकशी पथक आर्वीत दाखल झाले.
तेरा वर्षांच्या मुलीचा गर्भपात केल्यानंतर तिच्या पोटात उठलेल्या वेदनांमुळे या संतापजनक प्रकरणाचा बोभाटा झाला. आर्वी पोलिसांनी या प्रकरणात ११ जानेवारीला डॉ. रेखा कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर जिल्हा आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांची भूमिका चर्चेला आली. पोलीस तपासात काही संशयास्पद मुद्दे अधोरेखित झाल्याने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी १२ जानेवारीला जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन करून या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आणि चौकशीला सहकार्य करण्यासाठी विनंती केली.
मात्र, दुसरा दिवस उजाडला तरी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पोलीस विभागाला रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी १३ जानेवारीला जिल्हा शल्य चिकित्सकांना एक पत्र पाठविले. त्यात या गंभीर गर्भपात प्रकरणाचा उल्लेख करून 'तुम्ही चौकशी करावी. काही जप्त करायचे असेल तर ते करावे आणि पोलीस विभागाला अहवाल तसेच तक्रार द्यायची की काय, त्याचा निर्णय घ्यावा, असे कळविण्यात आले. या पत्रालाही जिल्हा शल्य चिकित्सकांकडून तातडीने प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, १४ जानेवारीला ‘लोकमत’ने आर्वी शहरात जाऊन या प्रकरणाची पाळेमुळे खोदण्याचा प्रयत्न केला. त्यातून डॉ. कदम हॉस्पिटलमधील पापात जिल्हा आरोग्य यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे पुढे आले. तसे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारी, १५ जानेवारीच्या अंकात ठळकपणे प्रकाशित केले. यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली.
वरिष्ठ पातळीवरून यासंदर्भात संबंधितांना विचारपूस सुरू झाल्यामुळे 'मौनीबाबा'च्या भूमिकेत असलेल्या जिल्हा आरोग्य यंत्रणेने हालचाल सुरू केली. या पार्श्वभूमीवर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता भिसे यांनी गर्भपात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी १५ जानेवारीला एक चौकशी पथक आर्वी शहरात पाठविले. या पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क केल्यानंतर पोलिसांनी तात्पुरते सील केलेले कदम हॉस्पिटल उघडून दिले.
वृत्त लिहिस्तोवर या पथकाची चौकशी हॉस्पिटलमध्ये सुरू होती. त्यांनी कोणती चौकशी केली, काय जप्त केले, त्याचा खुलासा वृत्त लिहिस्तोवर होऊ शकला नाही. वर्धा शहरातून आर्वीला पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त दीड तासाचा कालावधी लागतो. पोलिसांनी तोंडी व लेखी सूचना देऊनही चौकशी पथकाला तेथे पोहोचण्यासाठी तब्बल ६० तासांचा कालावधी लागला. जिल्हा आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठांनी ही चौकशी समिती पाठविण्यासाठी एवढा प्रदीर्घ वेळ का घेतला, ते कळण्यास मार्ग नाही.