वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी
By admin | Published: May 15, 2016 02:45 AM2016-05-15T02:45:58+5:302016-05-15T02:45:58+5:30
‘मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाचे कार्य सुरू असल्याने शनिवारी पहाटेपासून वर्धा रोडवरील चिंचभुवन पूल ते सोनेगाव पोलीस स्टेशनपर्यंत वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
विमान पकडण्यासाठी पायी चालले प्रवासी : वाहतूक नियंत्रणाचा अभाव
नागपूर : ‘मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाचे कार्य सुरू असल्याने शनिवारी पहाटेपासून वर्धा रोडवरील चिंचभुवन पूल ते सोनेगाव पोलीस स्टेशनपर्यंत वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. वाहन लवकर काढण्याच्या प्रयत्नात अनेक वाहने अडकून पडली. विशेष म्हणजे, या मार्गावरील वाहतूक अनियंत्रित झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली. विमानतळावर जाणाऱ्या काही प्रवाशांना हातात सामान घेऊन पायी चालावे लागले.
सकाळी साधारण ६ वाजता विमानतळाच्या सीमेलगत वर्धा रोडच्या एका भागात वाहतुकीसाठी एक रस्ता सुरू होता. चिंचभुवन पूल ते नागपूरकडे येणाऱ्या मार्गावर कठडे लावण्यात आले होते. याच दरम्यान या मार्गावर वाहतूक खोळंबली. एका खासगी ट्रॅव्हल्सच्या कंडक्टरने रस्त्याच्या दुसऱ्या भागातील कठडे हटविले, आणि बसला समोर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु अरुंद मार्गावर दोन्ही भागातून वाहतूक आल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
मेट्रो रेल्वे प्रोजेक्टचे कार्य सुरू असल्याने रोड डिव्हायडरच्या दोन्ही भागात साधारण चार फुटाच्या अंतरावर सुरक्षेसाठी टीन लावण्यात आले आहे. यामुळे हा रस्ता आणखी अरुंद झाला आहे. यातच सकाळच्यावेळी विमान प्रवाशांची संख्या मोठी असते. बहुसंख्य प्रवासी कारनेच विमानतळावर पोहचतात. चिंचभुवन आणि बुटीबोरी येथून अनेक प्रवासी रेल्वेस्थानकासाठी ये-जा करतात. याच वेळेस चंद्रपूर, अमरावती, हैदराबादसह विविध शहरांसाठी बसची रहदारी वाढलेली असते.
परंतु या मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने वारंवार कोंडी निर्माण होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना सूचना दिल्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर वाहतूक पोलीस आलेत. परंतु वाहतूक सुरळीत करण्यास अर्ध्या तासाच्यावर वेळ लागला. (प्रतिनिधी)
वाहतूक विभागाला
दिले पत्र
वर्धा मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीला घेऊन नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पाेरेशन लिमिटेडचे अध्यक्ष बृजेश दीक्षित म्हणाले, या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना पत्र दिले आहे.