नागपूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाला करावी लागली वॉर्डाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:24 PM2018-06-29T13:24:45+5:302018-06-29T13:25:24+5:30

वॉर्डातील सफाईकडे झालेल्या दुर्लक्षाला घेऊन एका रुग्णाने सफाई कर्मचारी आणि परिचारिकेकडे तक्रार केल्यावर त्यालाच सफाई करण्यास सांगितले. त्या रुग्णाने दुखणे सहन करीत एक नव्हे तर दोन दिवस वॉर्डाची सफाई केली.

Wardha's cleanliness should be done at the government hospital in Nagpur | नागपूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाला करावी लागली वॉर्डाची स्वच्छता

नागपूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाला करावी लागली वॉर्डाची स्वच्छता

googlenewsNext
ठळक मुद्देव्हिडीओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वॉर्डातील सफाईकडे झालेल्या दुर्लक्षाला घेऊन एका रुग्णाने सफाई कर्मचारी आणि परिचारिकेकडे तक्रार केल्यावर त्यालाच सफाई करण्यास सांगितले. त्या रुग्णाने दुखणे सहन करीत एक नव्हे तर दोन दिवस वॉर्डाची सफाई केली. एका सामाजिक कार्यकर्त्याने मोबाईलमधून त्याचा व्हिडीओ काढून व्हायरल करताच खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याचे बोलले जात आहे.
रोशन हिवरेकर (३०) रा. ओमनगर, सक्करदरा असे त्या रुग्णाचे नाव आहे. रोशन हा ‘किंग कोब्रा युथ फोर्स आॅर्गनायझेशन’ या सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता आहे. हिमोग्लोबिन व कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आल्याने रोशनला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी २३ जून रोजी मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये भरती केले. त्याला सलाईन लावून उपचाराला सुरुवातही झाली. याच वॉर्डात मानेवाडा येथील एक वृद्ध रुग्ण उपचार घेत होता. ‘किंग कोब्रा युथ फोर्स आॅर्गनायझेशन’चे अरविंदकुमार रतुडी यांनी सांगितले, २६ जून रोजी या वृद्धाचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्याासोबत कुणीच नव्हते. तब्बल एक तास वृद्धाचा मृतदेह खाटेवरच पडून होता. त्यानंतर ‘वॉर्ड बॉय’ व नातेवाईकही आले. ‘वॉर्ड बॉय’ने वृद्धाला लावलेली लघवीची नळी जोरात ओढून काढली. लघवी फरशीवर सांडली. मृतदेह स्ट्रेचरवर टाकून नातेवाईकांनाच ओढण्यास सांगितले. याचवेळी परिचारिकेने सफाई कर्मचाऱ्याला वॉर्ड स्वच्छ करण्यास सांगितले. परंतु त्याने स्पष्टपणे नकार दिला. कर्मचारी वॉर्ड स्वच्छ का करीत नाही, असा प्रश्न रुग्ण रोशनने केला असता, ‘तुम्हाला करायची असेल तर करा!’ असे उर्मट उत्तर परिचारिकेने दिले. संपूर्ण वॉर्डभर दुर्गंधी पसरली होती. वॉर्डात थांबणेही कठीण झाले होते. परिचारिका, अटेंडंट, सफाईगारांची हेकेखोरवृत्ती, बेजबाबदारपणा पाहून सामाजिक कार्यकर्ता असलेल्या रोशनने स्वत:च्या हाताची सलाईन काढून ठेवत संपूर्ण वॉर्ड पाण्याने स्वच्छ करून पुसून काढला. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारीही रोशनने वॉर्ड स्वच्छ केला. याची माहिती संघटनेला मिळताच, त्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ व्हायरल होताच गुरुवारी प्रशासन जागे झाले. परंतु त्या कर्मचाऱ्यावर किंवा परिचारिकेवर कारवाई झालेली नाही, असेही रतुडी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.

-स्वत:हून केली सफाई, घेतले लिहून
व्हिडीओ व्हायरल होताच प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहत परिचारिकेने वॉर्डात सफाई कर्मचारी राहत नाही, वॉर्ड बॉय राहत नाही, म्हणून मी स्वत:हून स्वच्छता केली, असे रोशनकडून लिहून घेतले. परंतु रुग्णावर स्वच्छतेची वेळ येणे, आणि त्याला ते काम करू देणे, हा गुन्हा ठरत असल्याने मेडिकल प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जनहित याचिका दाखल करू
रुग्णाकडून वॉर्डाची सफाई करून घेणे, हा चीड आणणारा प्रकार आहे. हे अमानवीय आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास, जनहित याचिका दाखल करून दाद मागितली जाईल.
-अरविंदकुमार रतुडी
अध्यक्ष, किंग कोब्रा यूथ फोर्स आॅर्गनायजेशन

Web Title: Wardha's cleanliness should be done at the government hospital in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.