पांढराबोडीत खुनी संघर्ष

By admin | Published: September 13, 2015 02:35 AM2015-09-13T02:35:44+5:302015-09-13T02:35:44+5:30

पांढराबोडीतील गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता झालेल्या खुनी संघर्षात दोन जण गंभीर जखमी झाले तर, अनेकांना जबर जखमा झाल्या.

Wardrobe killer struggle | पांढराबोडीत खुनी संघर्ष

पांढराबोडीत खुनी संघर्ष

Next

नागपूर : पांढराबोडीतील गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता झालेल्या खुनी संघर्षात दोन जण गंभीर जखमी झाले तर, अनेकांना जबर जखमा झाल्या. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड तणाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पांढराबोडीतील गुंडांच्या एका टोळीने शुक्रवारी दहीहंडीचा कार्यक्रम ठेवला होता. या भागातील अवैध दारू विक्रेता या कार्यक्रमाचा मुख्य प्रायोजक होता. त्यात प्रतिस्पर्धी गटातील गुंडही आले होते. त्यामुळे एक दुसऱ्याला टोमणे मारण्याचा प्रकार सुरू झाला. तो वाढतच गेला. दोन्ही गटाने आपल्या गुंडांची जमवाजमव करण्यासोबतच तलवारी, चाकू, रॉड, लाठ्याही आणल्या. त्यानंतर पांढराबोडीतील छोट्या मैदानाजवळ सेवक मसराम, बद्दी रामटेके तसेच भुऱ्या बनोदे, रोहित चव्हाण यांनी आपापल्या गुंडांसोबत एकमेकांवर हल्ला चढवला.

सिनेमातील टोळीयुद्धासारखा प्रकार
पांढराबोडीत खुनी संघर्ष

नागपूर : आरोपी सेवक मसराम, बद्दी ऊर्फ राकेश रामटेके, अमित ऊर्फ गम्या ठोसर, सतीश चन्ने, रोशन शेंदरे, गोलट्या ऊर्फ नरेश मसराम, धीरज बाबोर्डे आणि त्याच्या साथीदारांनी भुऱ्या ऊर्फ बादशहा ऊर्फ संजय कंदई बनोदे (वय ३६, रा. पांढराबोडी) याच्या डोक्यावर तसेच छातीवर तलवारीचे घाव घातल्याने तो गंभीर जखमी झाला. भुऱ्याचे चार ते पाच साथीदारही जबर जखमी झाले.
याच वेळी भुऱ्या आणि रोहित चव्हाण, आशिष डोंगरे, दिनेश इंगोले, चंदू मानेराव, अक्षय बत्तुलवार, भूषण चोटीलवाल तसेच त्याच्या साथीदारांनी सेवक आणि बद्दीच्या साथीदारांवर हल्ला चढवल्याने राकेश महादेव रामटेके (वय ३२, रा. जयनगर, पांढराबोडी) गंभीर जखमी झाला. तर, भुऱ्याचे पाच साथीदार गंभीर जखमी झाले.
सिनेमातील टोळीयुद्धासारखा हा प्रकार तब्बल २० मिनिटे सुरू होता. त्यामुळे घटनास्थळ परिसरात प्रचंड दहशत आणि तणाव निर्माण झाला होता.
विशेष म्हणजे, हा थरार सुरू असताना काही अंतरावर पोलीस उभे होते. त्यांनी नंतर मोठा ताफा बोलवून घेतला तोपर्यंत आरोपी पळून गेले. पोलिसांनी भुऱ्याच्या तक्रारीवरून सेवक तसेच त्याच्या साथीदारांविरुद्ध तर राकेशच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी भुऱ्या तसेच त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले.
‘गेम प्लान’ची तयारी
पांढराबोडीत बहुतांश रहिवासी गरीब आहेत. दिवसभर कबाडकष्ट करून दोन वेळेच्या जेवणाची ते कशीबशी व्यवस्था करतात. या भागात गुंडांच्या तीन ते चार टोळ्या असून, दारू, गांजा, जुगार या अवैध धंद्यांसोबतच ते खंडणी वसुलीही करतात. वर्चस्व निर्माण करण्यासाठी या गुंडांच्या टोळ्यांमध्ये नेहमीच हाणामाऱ्या, हल्ले प्रतिहल्ले सुरू असतात. त्यामुळे या परिसरातील गोरगरीब, सामान्य नागरिक नेहमीच दहशतीत असतात. शुक्रवारच्या घटनेनंतर आपल्या विरोधात बयानबाजी होऊ नये म्हणून, गुंडांनी या परिसरातील नागरिकांना धमकावणे सुरू केले आहे. या हाणामारीतील कुख्यात सेवक आणि त्याच्या साथीदारांनी गेल्या वर्षी बाल्या उके याची सलूनमध्ये निर्घृण हत्या केली होती. दोन महिन्यांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला. आता त्याने पुन्हा गुंडगिरी सुरू केली आहे. तर, त्याला रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी गुंडही अनेक दिवसांपासून ‘गेम प्लान’ करीत आहेत. त्यामुळे या भागात कोणत्याही दिवशी मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Wardrobe killer struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.