विरोधीपक्ष आमदार झाले वारकरी, मविआतर्फे सरकारविरोधात टाळ कुटो व दिंडी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 10:44 AM2022-12-27T10:44:57+5:302022-12-27T10:46:45+5:30
Winter Session Maharashtra 2022 : सातव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार भ्रष्टाचारी मंत्र्याच्या विरोधात आक्रमक
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विरोधपक्षाने सरकारविरोधात टाळ कुटो व दिंडी आंदोलन करीत सत्ताधारी सरकारचा निषेध नोंदवला. भूखंड घ्या.. कुणी गायरान घ्या.. खोक्यानं घ्या.. कुणी खोऱ्यानं घ्या.., कुणी गुवाहाटीला जा कुणी सुरतला जा.. असे अभंग गात विरोधकांनी सत्ताधारी पक्षाविरोधात सूर आवळला.
विधिमंडळ अधिवेशनाचा कालचा दिवस सीमावाद प्रश्न, भूखंड घोटाळा आणि सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीवरून विरोधक-सत्ताधाऱ्यांच्या तू तू - मै मै ने गाजला. तर, आज सकाळी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर अभंग गात आंदोलन सुरू केले. भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, उदय सामंत, संजय राठोड यांच्या नावाने शिमगा करीत त्यांचा निषेध केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळील काँग्रेस कार्यालयाजवळून सर्व आमदारांनी डोक्यात पांढऱ्या टोप्या परिधान करून गळ्यात टाळ लटकवून फुगड्या घालत, रिंगण करीत व अभंग गात टाळ वाजवत विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ येऊन आंदोलन सुरू केले.
महाविकास आघाडी तर्फे सरकार विरोधात टाळ कुटो व दिंडी आंदोलन#Maharashtrapic.twitter.com/axf3izXFjm
— Lokmat (@lokmat) December 27, 2022
या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लवकर लुटा तुम्ही लवकर लुटा, महाराष्ट्राला लुटा तुम्ही जनतेला लुटा, गुवाहाटीला चला तुम्ही सुरतेला चला, खोके घ्यायला चला.. अशा घोषणांनी विधान भवन परिसर दणाणला. या आंदोलनाला विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रोहित पवार, आदित्य ठाकरे, यशोमती ठाकूर, नाना पटोले, अमोल मिटकरी, भास्कर जाधव आदि नेते, आमदार सहभागी होते.