आरटीईच्या प्रक्रियेवर बहिष्काराचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 09:47 PM2019-02-25T21:47:21+5:302019-02-25T21:49:35+5:30
राईट टु एज्युकेशन (आरटीई)ची शाळांना मिळणारी प्रतिपूर्ती गेल्या दोन वर्षापासून थकीत आहे. २०१८-१९ साठी शासनाने पुन्हा आरटीईची प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे आरटीईच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा)ने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राईट टु एज्युकेशन (आरटीई)ची शाळांना मिळणारी प्रतिपूर्ती गेल्या दोन वर्षापासून थकीत आहे. २०१८-१९ साठी शासनाने पुन्हा आरटीईची प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे आरटीईच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा)ने दिला आहे. त्याचबरोबर सोमवारी मेस्टा अंतर्गत येणाऱ्या शाळांनी शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले. त्याचबरोबर मेस्टाच्या पदाधिकाऱ्यांनी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना सुद्धा आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. यासंदर्भात बोलताना मेस्टाचे अध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे म्हणाले की, बारावीची परीक्षा सुरू असल्यामुळे आम्ही शाळा बंद केल्या नाही. शासनाचा निषेध म्हणून काळी पट्टी लावून कामकाज सुरू ठेवले. पण शासनाने आरटीईची प्रतिपूर्ती पात्र शाळांना त्वरित करावी, मोफत प्रवेशाच्या जागा वाढविण्यात याव्यात, आरटीईत नोंदणी करण्याचे अधिकार शाळांना देण्यात यावे, प्रथम मान्यता, आरटीई मान्यता व नैसर्गिक वाढ त्वरित देण्यात यावी तसेच आरटीई प्रतिपूर्तीचा दर वाढविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. निवेदन देताना मेस्टाचे विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे, कपिल उमाळे, मोहमद आबिद, नरेश भोयर आदी उपस्थित होते.