पावसाच्या दडीनंतर विदर्भात पुन्हा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:08 AM2021-09-19T04:08:20+5:302021-09-19T04:08:20+5:30
नागपूर : पावसाचे अनियमित आगमन सुरू असताना हवामान विभागाने पुन्हा या आठवड्यात विदर्भात पावसाची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, मागील ...
नागपूर : पावसाचे अनियमित आगमन सुरू असताना हवामान विभागाने पुन्हा या आठवड्यात विदर्भात पावसाची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, मागील २४ तासात विदर्भात पावसाची कुठेही नोंद झाली नाही. नागपुरात काही भागात थोडा वेळ रिमझिम पावसाने हजेरी लावली होती.
मागील आठवड्यात झालेल्या भरघोस पावसानंतर आता तो थोडा उदासीन झाल्यासारखा दिसत आहे. विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्ह्यात मागील दोन दिवसात पावसाची किरकोळ नोंद आहे. असे असले तरी १८ ते २२ सप्टेंबर या काळात मात्र हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस वर्तविला आहे. विदर्भात २० आणि २१ तारखेला गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. नागपुरातही पाऊस अनियमित असल्याने वातावरणावर परिणाम दिसत आहे. आर्द्रता अधिक वाढल्याने वातावरणात दमटपणा जाणवत आहे. शहरातील दिवसभराचे तापमान ३१.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. नागपूर सकाळी ८ वाजता आर्द्रता ९० टक्के नोंदविण्यात आली तर सायंकाळी यात वाढ होऊन ७४ नोंदविली गेली. हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यातही या आठवड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस वर्तविला आहे.