भाजपच्या माजी नगरसेवकांसाठी धोक्याची घंटा, ३० टक्क्यांचे रिपोर्टकार्ड नकारात्मक
By योगेश पांडे | Updated: January 21, 2025 22:31 IST2025-01-21T22:31:11+5:302025-01-21T22:31:53+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने पक्षाकडून पहिले सर्वेक्षण पूर्ण

भाजपच्या माजी नगरसेवकांसाठी धोक्याची घंटा, ३० टक्क्यांचे रिपोर्टकार्ड नकारात्मक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसताना भारतीय जनता पक्षाकडून नियोजनाला सुरुवात झाली आहे. पक्षाने उमेदवारीच्या दृष्टीने प्रदेश पातळीवर सर्वेक्षण केले होते. मात्र त्यामुळे पक्षाची चिंता वाढली आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांपैकी ३० टक्के जणांचे रिपोर्टकार्ड नकारात्मक आले आहे. त्यामुळे यातील अनेकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचेच संकेत, या सर्वेक्षण अहवालातून मिळाले आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसण्यात आली आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यात मुंबई, ठाणे, नागपूर, नवी मुंबईसह अनेक महापालिकांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून प्रदेश पातळीवर एक सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात सर्वच प्रभागांतील माजी नगरसेवकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. तसेच सध्याचे विद्यमान नगरसेवक, लोकप्रतिनिधींबाबत जनतेची मते काय हे जाणून घेतले. मात्र ३० टक्क्यांहून अधिक नगरसेवक जनतेत जाऊन कामच करत नसल्याची बाब त्यातून समोर आली. त्यामुळे पक्ष नेत्यांनादेखील धक्का बसला आहे. अशाच पदाधिकाऱ्यांमुळे पक्षाला लोकसभेत फटका बसला होता. ही बाब पक्षाकडून गंभीरतेने घेण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाकडून आणखी दोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे व त्याच्या आधारावरच तिकीट वाटप होईल.
जनतेत जाऊन काम करणाऱ्यांसोबत पक्ष : शहराध्यक्ष
याबाबत शहराध्यक्ष बंटी कुकडे यांना विचारणा केली असता, त्यांनी सर्वेक्षण झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला. पक्षाकडून नियमितपणे सर्वेक्षण करण्यात येतात. २०२२ नंतर सर्वच नगरसेवक माजी झाले आहेत. मात्र त्यांनी जनतेत जाऊन काम करणे अपेक्षित आहे. जो जनतेत जाऊन काम करतो आहे त्याच्यासोबत पक्ष नेहमीच असेल. अशा लोकप्रतिनिधींचा तिकीट वाटपात निश्चितपणे विचार होईल. जे कामच करत नाहीत, त्यांच्याबाबत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व नेते निर्णय घेतील, असे कुकडे यांनी स्पष्ट केले.