चंद्रपूरसह अमरावती, यवतमाळात आज उष्ण लहरीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:35+5:302021-04-06T04:07:35+5:30
नागपूर : मार्च महिन्याच्या अखेरपासून विदर्भातील तापमान वाढत असतानाच पुन्हा चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्ण लहरीचा इशारा हवामान ...
नागपूर : मार्च महिन्याच्या अखेरपासून विदर्भातील तापमान वाढत असतानाच पुन्हा चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्ण लहरीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस वातावरण कायम राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
रोज तापमान वाढत असतानाच वातावरणात अकस्मातपणे बदलही घडत आहेत. हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने ९ एप्रिलला विदर्भभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, सोमवारी नागपुरात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. वर्धामध्ये ४१.१, गडचिरोलीत ४१.२,अमरावतीमध्ये ४१.४ तर चंद्रपुरात ४१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. अकोला शहरात सर्वाधिक म्हणजे ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी सर्वात कमी तापमान बुलडाणा येथे ३९.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.