काम न करणाऱ्या कंत्राटदारांना मुंढेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 08:45 PM2020-02-17T20:45:52+5:302020-02-17T23:34:38+5:30

कार्यादेशानंतर कामांना सुरुवात न करणाऱ्या कंत्राटदारांना महापालिका काळ्या यादीत टाकणार आहे तसेच सुरू न झालेली कामे रद्द केली जाणार आहेत.

Warning by Mundhe for non-working contractors | काम न करणाऱ्या कंत्राटदारांना मुंढेचा इशारा

काम न करणाऱ्या कंत्राटदारांना मुंढेचा इशारा

Next
ठळक मुद्देकाळ्या यादीत टाकणार : विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कंत्राटदार किंवा कंपनीच्या कामाच्या निविदा मंजूर झाल्यानंतर कार्यादेश दिले जातात. मात्र कार्यादेशानंतरही विकास कामांना सुरुवात केली जात नाही. परिणामी विलंब झाल्याने प्रकल्पावरील खर्च वाढतो. नागरिकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शहरातील सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या बाबतीत असाच प्रकार घडत आहे. कार्यादेशानंतर कामांना सुरुवात न करणाऱ्या कंत्राटदारांना महापालिका काळ्या यादीत टाकणार आहे तसेच सुरू न झालेली कामे रद्द केली जाणार आहेत.
विकास कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी दंडात्मक तरतूद करण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. यामुळे रखडलेल्या विकास कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेचे उत्पन्न व मंजूर विकास कामे यात मोठी तफावत आहे. गेल्या काही वर्षांत निधी नसतानाही अनेक कोट्यवधींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीत प्रत्येकी बैठकीत विकास कामांना मंजुरी देऊन कार्यादेश काढले जातात. यात मूलभूत सुविधांच्या कामांचाही समावेश असतो. परंतु उत्पन्नाच्या तुलनेत देणी वाढल्याने महापालिका आर्थिक अडचणीत आहे. यातून मार्ग काढला जात आहे. रस्ते, सिवर लाईन, पाणी पुरवठ्यासाठी लाईन टाकणे, अशा आवश्यक कामांना निधी उपलब्ध केला जाणार आहे.
महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आलेल्या हुडकेश्वर, नरसाळा या भागातही मोठ्या प्रमाणातील कामांना मंजुरी मिळाली. रस्ते, सिवरलाईन, पूल बनविण्यासारख्या कामांचाही यात समावेश होता. यातील अनेक कामे अद्यापही कागदावरच आहेत. कामांचे कार्यादेश मिळाले. परंतु ती सुरू झालेली नाहीत. यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

निधी उपलब्ध असूनही विलंब
कंत्राटदारांना कामे मिळाल्यानंतर काही कामासाठी निधी उपलब्ध झाला नाही. तसेच निधी उपलब्ध झाल्यानंतरही काही कंत्राटदारांनी कामे वेळेत सुरू केलेली नाही. त्यातील काही कामांना ब्रेक लावला. काही कंत्राटदारांवर कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिले. यामुळे कंत्राटदारात खळबळ उडाली आहे.

Web Title: Warning by Mundhe for non-working contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.