नागपूरसह विदर्भात इशारा : पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 10:11 PM2021-06-15T22:11:54+5:302021-06-15T22:12:29+5:30
Heavy rains Warning in Nagpur and Vidarbha पुढील तीन दिवसात नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वादळवारे आणि मेघगर्जनेसह होणाऱ्या या पावसाच्या अंदाजामुळे सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुढील तीन दिवसात नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वादळवारे आणि मेघगर्जनेसह होणाऱ्या या पावसाच्या अंदाजामुळे सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागपुरात मंगळवारी दुपारी सुमारे अर्धा तास जोराच्या वाऱ्यासह पाऊस बरसला. या पावसामुळे अनेक खोलगट भागात पाणी साचले. मात्र काही वेळातच पाऊस थांबल्याने वातावरण पूर्ववत झाले. पावसामुळे आणि वाऱ्यामुळे वातावरणात थंडावा आला आहे. सायंकाळी बराच बदल जाणवला. कालच्या पेक्षा तापमानामध्ये १.१ अंश सेल्सिअसने घट झाली असून पारा ३५.७ वर आला आहे. सकाळी आर्द्रता ७७ टक्के नोंदविली गेली तर सायंकाळी ९० टक्के होती.
मागील २४ तासात चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यात चांगली पर्जन्यवृष्टी झाली. चंद्रपुरात ७८.४ मिमी तर अमरावतीमध्ये ६३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नागपूरमध्येही ४.४ मिमी पाऊस नोंदविला गेला. या सोबतच, गोंदिया, वाशिम येथेही पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने १७ ते १९ जून या काळात विदर्भात मुसळधार व सार्वत्रिक पावसाचा इशारा दिला आहे. पावसासोबत ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मेघ गर्जना आणि विजांचा इशाराही दिला आहे.
विदर्भातील तापमान
जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३८.७ : २५.५
अमरावती : ३३.४ : २१.३
बुलडाणा : ३५.० : २५.२
चंद्रपूर : ३१.२ : २१.९
गडचिरोली : २८.४ : २३.०
गोंदिया : ३२.६ : २३.५
नागपूर : ३५.७ : २३.८
वर्धा : ३६.० : २२.८
वाशिम : ३१.० : २०.०
यवतमाळ : ३४.० : अप्राप्त