विदर्भात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; ५० वर्षांत प्रथमच अशी पूरस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 08:54 PM2022-07-13T20:54:19+5:302022-07-13T21:02:12+5:30
Nagpur News विदर्भात गेल्या काही दिवसांत विक्रमी पाऊस पडत असून, जुलैच्या आठवडाभरात जून-जुलैच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक पावसाची नाेंद झाली आहे.
नागपूर : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस संकट रूपाने बरसत आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांत विक्रमी पाऊस पडत असून, जुलैच्या आठवडाभरात जून-जुलैच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक पावसाची नाेंद झाली आहे. धाेकादायक म्हणजे येत्या १७ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने परिस्थिती आणखी वाईट हाेण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. तज्ज्ञांच्या मते साधारणत: ऑगस्ट महिन्यात पूरस्थिती निर्माण हाेते; पण यावेळी जुलैच्या मध्यातच ही स्थिती निर्माण झाली आहे.
ओडिसाची किनारपट्टी व आसपासच्या परिसरात सायक्लाेनिक सर्क्युलेशनसह कमी दाबाचे माेठे क्षेत्र निर्माण झाले आहे. शिवाय अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातही निर्माण झालेल्या वातावरणीय स्थितीमुळे मान्सून अत्याधिक सक्रिय झाला आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र ही स्थिती आहे. विदर्भात १३ जुलैपर्यंत सरासरी २९९ मिमी पावसाची नाेंद हाेते; पण यावेळी तब्बल ४०५.४ मिमी पावसाची नाेंद झाली असून ती ३६ टक्के अधिक आहे. विदर्भात संपूर्ण जुलै महिन्यात ३२५ ते ३४० मिमी पाऊस नाेंदविला जाताे. मात्र, यावर्षी जुलैच्या मध्यात त्यापेक्षा दीडपट अधिक पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसांत अति ते अत्याधिक पावसाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्रीत विदर्भात सर्वत्र जाेरदार पाऊस झाला. बुधवारी दिवसा काहीसी गती मंदावली असली तरी सातत्य हाेते व काही भागात अतिवृष्टीचा कहर कायम आहे. नागपुरात २४ तासात ६९.४ मिमी पाऊस नाेंदविला गेला. गडचिराेलीत रात्रीच्या ६४.४ मिमीसह २४ तासात ९९.४ मिमी पाऊस नाेंदविण्यात आला. जिल्ह्यात मात्र अतिवृष्टीमुळे काही तालुके पूरग्रस्त झाले आहेत. दुसरीकडे गाेंदियात सायंकाळपर्यंत ८ मिमी पावसासह २४ तासात ६०.८ मिमी नाेंद झाली. वर्धा येथे रात्री ८७.४ मिमीसह ८९.४ मिमी नाेंद झाली.
५० वर्षांत पाहिली नाही अशी स्थिती
तज्ज्ञांच्या मते मागील ५० वर्षांत अशी स्थिती पहिल्यांदा अनुभवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत बदलत्या हवामानामुळे कमी दिवसात अत्याधिक पाऊस हाेत असून, आधीसारख्या अनेक दिवसांच्या झड लागण्याचा प्रकार कमी झाला; पण गेल्या आठ दिवसांच्या झडीने जुन्या दिवसाची आठवण लाेकांना झाली. साधारणत: म्हणजे ऑगस्ट महिन्यात पूरस्थिती निर्माण हाेते; पण यावर्षी जुलैच्या सुरुवातीलाच ही स्थिती निर्माण झाली आहे.