पावसाचा इशारा, पारा पुन्हा उतरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:32+5:302021-05-31T04:07:32+5:30
नागपूर : वातावरणातील बदलामुळे कमी-अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. यामुळे उष्णता कायम असली तरी त्यात उकाड्याचीही चांगलीच भर पडली ...
नागपूर : वातावरणातील बदलामुळे कमी-अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. यामुळे उष्णता कायम असली तरी त्यात उकाड्याचीही चांगलीच भर पडली आहे. यामुळे सध्या विदर्भातील जनता त्रस्त झालेली आहे. मागील २४ तासांपूर्वी नागपुरातील तापमान वाढलेले असताना रविवारी ते पुन्हा १.६ अंश सेल्सिअसने खालावले. रविवारी ४२.३ अंशावर पारा आला होता.
नागपुरात सकाळी ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता ६२ टक्के होती. दिवसभर उन-सावलीचा लपंडाव सुरू होता. सायंकाळी आर्द्रता ३८ पर्यंत घसरली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नवतपाच्या उर्वरित दिवसातही असेच ढगाळ वातावरण राहील, ऊनही तापेल. पावसाचाही अंदाज विदर्भात वर्तविला असून, सूर्यास्तानंतर जोराच्या वाऱ्यासोबत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊसही येऊ शकतो. ३ जूनपर्यंत विदर्भात सर्वच जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला आहे. यंदा नागपुरात दरवर्षीसारखा ४६ ते ४७ अंशापंर्यंत पारा पोहोचला नाही. यंदाच्या मोसमात नागपूरचे सर्वाधिक तापमान ४३.९ अंश सेल्सिअस असे शनिवारी नोंदविण्यात आले.
नागपुरात मान्सूनचे ८ ते १० जूनच्या दरम्यान आगमन होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतामध्ये वेळेवर मान्सून पोहोचेल, असा अंदाज आहे. वातावरण चांगले राहिले तर विदर्भात वेळेवर मान्सून येऊ शकतो. यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य असेल, असा अंदाज आहे.
रविवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील तापमान खालावले होते. चंद्रपुरात शनिवारी एकाएकी ४ अंशाने वाढलेले तापमान रविवारी ४.६ ने खालावले. तिथे ४१.६ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली. ब्रह्मपुरी सर्वाधिक गरम राहिले. तिथे ४३.८ अशी नोंद झाली. या सोबतच बुलडाणा ३५, वाशिम ३७.२, अमरावती ४०.८, अकोला ४१, वर्धा ४१.५ आणि गोंदियात ४२.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. विदर्भातील तापमानात सर्वत्र घट झाली. मागील २४ तासांत बुलडाणामध्ये १८ मिमी, तर वर्धा येथे २.८ मिमी पावसाची नोंद झाली.