पुन्हा वादळी पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:18+5:302021-05-07T04:08:18+5:30
नागपूर : हवामान विभागाने पुढचे चार दिवस पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ...
नागपूर : हवामान विभागाने पुढचे चार दिवस पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाचे हे वादळ असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यात ७ ते १० मे या काळात मेघगर्जनेसह एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वर्धा, भंडारा, चंद्रपूर, अमरावती येथेही पुढील तीन दिवस तर गोंदिया आणि अकोल्यातही संभावना व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, नागपुरातील आणि ग्रामीण नागपूरमधील वातावरण दुपारपासूनच बदलले आहे. दुपारी नागपूरसह लगतच्या काही भागात हलका पाऊस आला. वातावरण ढगाळलेले असल्याने दुपारनंतर उष्णतामानातही बरीच घट झाली. यामुळे दिवसभराच्या तापमानात कालच्यापेक्षा ०.९ अंश सेल्सिअसने घट होऊन पारा ४१ वर स्थिरावला. सकाळी आर्द्रता ४६ टक्के तर सायंकाळी ४७ टक्के नोंदविण्यात आली.
अकोल्यामधील तापमान सर्वाधिक ४३.४ अंश सेल्सिअस होते. यापाठोपाठ वर्धा ४२.२ तर, यवतमाळचे ४२.५ अंश सेल्सिअस होते. वाशिम ४०.४, अमरावतीमध्ये ४१, चंद्रपुरात ४१.८ तर नागपूर व गोंदियामध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भंडाऱ्यामध्ये ३९.६ आणि गडचिरोलीत ३८.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
...