सावधान : नागपुरातील सहारा सिटीच्या परिसरात फिरत आहे वाघिण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:45 PM2018-11-12T23:45:17+5:302018-11-12T23:50:55+5:30
शहराच्या अगदी जवळ असलेल्या वर्धा रोडवरील सहारा सिटीच्या जवळपास वाघ फिरत असल्याचे सांगितले जाते. स्थानिक नागरिकही वाघ फिरताना दिसत असल्याचे सांगताहेत; काही नागरिकांनी तर वाघासोबत तिचे छावेही असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ती वाघिण असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या अगदी जवळ असलेल्या वर्धा रोडवरील सहारा सिटीच्या जवळपास वाघ फिरत असल्याचे सांगितले जाते. स्थानिक नागरिकही वाघ फिरताना दिसत असल्याचे सांगताहेत; काही नागरिकांनी तर वाघासोबत तिचे छावेही असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ती वाघिण असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सहारा सिटीच्या मागच्या बाजूला निर्माणाधीन बंगले रिकामे पडले आहेत. आजूबाजूचा परिसर झुडपी जंगलाने व्यापलेला आहे. त्याच्या मागे खापरी आणि मंगरुर वनक्षेत्र लागून आहे. त्यामुळे परिसरात वाघ दिसल्याच्या दाव्याला वन विभागही नाकारत नाही. स्थानिक नागरिक रात्रीच्या वेळी आपल्या घराबाहेर निघायलाही घाबरत आहेत.
स्थानिक नागरिकांनी तर वाघाचा व्हिडिओही बनवला आहे. याची माहिती होताच नागपूर प्रादेशिक वन विभागाचे अधिकारीही वाघाच्या शोधासाठी सक्रिय झाले आहेत. सहारा सिटीच्या परिसराचे क्षेत्र नागपूर प्रादेशिकच्या बुटीबोरी वन परिक्षेत्रांतर्गत येतो. त्यामुळे सोमवारी बुटीबोरी रेंजच्या टीमने सहारा सिटीच्या परिसरात गस्त घातली, सोबतच नागरिकांची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी झुडपी जंगलाच्या जवळपास वाघ दिसल्याचे सांगितले. यानंतर या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्याचा निर्णय वन अधिकाऱ्यांनी घेतला आहे. मंगळवारी सकाळीच सहारा सिटीच्या मागच्या बाजूला झुडपी जंगलात १५ ते २० कॅमरा ट्रॅप लावण्यात येतील.
यासंदर्भात बुटीबोरीचे आरएफओ रवींद्र घाडगे यांनी सांगितले की, माहिती मिळताच सर्चिंग करण्यात आले. वन कर्मचारी परिसराची मॉनिटरिंग करीत आहेत. मंगळवारी कॅमेरा ट्रॅप लावण्यात येतील.
महिनाभरापूर्वी बैलाची शिकार
सूत्रानुसार सहारा सिटीच्या जवळ खापरी गावात महिनाभरापूर्वी एका वन्यप्राण्याने बैलाची शिकार केली होती. ही शिकार बिबट्याने केल्याचा अंदाज लावला जात आहे. वन्यप्राण्याच्या पायांचे निशाणही काही ठिकाणी सापडले आहे. परंतु या पायांचे निशाण सहारा सिटीच्या मागच्या बाजूला असलेल्या झुडपी जंगलापर्यंत जातात. त्यानंतर ते संपतात. त्यामुळे याच परिसरातून वाघिण येत असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे.