पॅन्ट्री कार कर्मचारी, फूड स्टॉलधारकांना निर्वाणीचा ईशारा
By नरेश डोंगरे | Published: July 15, 2024 03:13 PM2024-07-15T15:13:26+5:302024-07-15T15:14:42+5:30
Nagpur : खाद्य पदार्थाच्या ठिकाणी घाण आढळल्यास कठोर कारवाई
नरेश डोंगरे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजुबाजुला घाण ठेवून तशाच वातावरणात खाद्य पदार्थ तयार करणाऱ्या अथवा विकणाऱ्या पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांना आणि ठिकठिकाणी फूड स्टॉल लावून खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना मध्य रेल्वेने निर्वाणीचा ईशारा दिला आहे. यापुढे असे काही आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.
आसाम एक्सप्रेसमधील पॅन्ट्री कारमध्ये कशा पद्धतीने घाण आहे आणि तेथील कचऱ्याची तेथील कर्मचारी कशी विल्हेवाट लावतात, त्याचा घाणेरडा व्हीडीओ ११ जुलै २०२४ ला व्हायरल झाला. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रेल्वे प्रशासनाला अनेकांनी या संबंधाने धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वे प्रशासनाने एक प्रसिद्धीपत्रक काढून पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांना आणि ठिकठिकाणी फूड स्टॉल लावून खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना निर्वाणीचा ईशारा दिला आहे. ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनविले जातात आणि विकले जातात, त्या ठिकाणी सर्वोत्तम स्वच्छता ठेवा. दर्जेदार खाद्यपदार्थ प्रवाशांना द्या. कुणीही घाणेरड्या वातावरणात खाद्य पदार्थ तयार करीत असतील किंवा कुणी फुड स्टॉलवाला आजुबाजूला घाण असताना तेथून काही विकत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड ईशाराही रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
प्रवाशांच्या आरोग्याशी खेळू नका
दोन महिन्यांपूर्वी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून अशाच प्रकारे विकण्यात आलेल्या बिर्याणीतून अनेकांना विषबाधा झाली होती. तेव्हापासून विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईची विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार, सर्व गाड्यांमध्ये स्वच्छता प्रोटोकॉलचे सक्तीने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. वेळोवेळी अनेक स्थानकावर आकस्मिक तपासणीही केली जात असून, अनेक स्टॉलधारकारंवर दंड तसेच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळू नका, अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल, असा ईशाराही स्टॉलधारक तसेच पॅन्ट्री कारमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.