वादग्रस्त वकील उके यांच्याविरुद्ध वॉरंट जारी
By admin | Published: April 22, 2017 02:56 AM2017-04-22T02:56:46+5:302017-04-22T02:56:46+5:30
वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक पाऊल पुढे टाकले आहे.
हायकोर्ट प्रबंधकाची कारवाई : शिक्षेवर अंमलबजावणीचे पाऊल
नागपूर : वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक पाऊल पुढे टाकले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासकीय प्रबंधकांनी उके यांना पकडून कारागृहात डांबण्याकरिता वॉरंट जारी केला आहे. न्यायालयाला शुक्रवारी ही माहिती देण्यात आली. न्यायमूर्ती, सरकारी वकील व न्यायालयीन अधिकारी यांच्याविरुद्ध विनाकारण अवमानजनक आरोप केल्यामुळे उके यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाने स्वत:हून फौजदारी अवमानना याचिका दाखल करून घेतली आहे. याप्रकरणात न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठाने २८ फेब्रुवारी २०१७ रोजी उके यांना दोन महिने साधा कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त साधा करावास अशी शिक्षा सुनावली आहे. परंतु, उके त्यापूर्वीपासूनच अज्ञात ठिकाणी लपून बसले आहेत. त्यामुळे या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही. प्रकरणावर आता २६ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.(प्रतिनिधी)