पाटनसावंगी ग्राम पंचायत सचिवांविरुद्ध वॉरंट जारी; उच्च न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे दणका
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: June 21, 2023 07:13 PM2023-06-21T19:13:49+5:302023-06-21T19:14:08+5:30
सार्वजनिक रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गावातील रवींद्र हटकर व इतर पाच शेतकऱ्यांनी संबंधित याचिका दाखल केली आहे.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित एका याचिकेवरील सुनावणीला सलग दोनवेळा गैरहजर राहिल्यामुळे सावनेर तालुक्यातील पाटनसावंगी ग्राम पंचायत सचिवांना दणका बसला आहे. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध तब्बल ५० हजार रुपये रकमेचा जामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे व येत्या १८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत.
सार्वजनिक रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गावातील रवींद्र हटकर व इतर पाच शेतकऱ्यांनी संबंधित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय रोहित देव व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
गावातील रमेश सोरटे यांनी सार्वजनिक रोडच्या ७०० चौरस फूट जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याचिकाकर्त्यांनी ग्राम पंचायत सचिवांना वेळोवेळी निवेदने सादर करून अनधिकृत बांधकाम हटविण्याची व सार्वजनिक रोडची जागा मोकळी करण्याची मागणी केली. परंतु, त्यांच्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अमित बालपांडे यांनी कामकाज पाहिले.