९,७४५ थकबाकीदारांना बजावले वॉरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:07 AM2021-09-03T04:07:30+5:302021-09-03T04:07:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील ४ लाख १ हजार ४०६ मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कराचे ६५० कोटी थकीत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील ४ लाख १ हजार ४०६ मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कराचे ६५० कोटी थकीत आहेत. यातील वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या ९ हजार ७४५ लोकांना मनपाच्या मालमत्ता कर विभागाने वॉरंट बजावले आहेत.
नोटीस बजावल्यानंतरही प्रतिसाद न देणाऱ्या २ हजार ५९५ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ४९५ मालमत्ता लिलावात काढून कर वसुली करण्यात आली. १२ मालमत्तांची विक्री करण्यात आली, तर तब्बल १३८ मालमत्ता महापालिकेच्या नावावर करण्यात आल्या आहेत.
वॉरंट बजावल्यानंतरही थकीत कर न भरल्यास वाॅरंट कार्यवाहीअंतर्गत जप्ती कारवाई केली जाते. थकबाकीदारांचे भूखंड व घरांची विक्री करण्याची मोहीम मनपाच्या मालमत्ता कर विभागाने हाती घेतली आहे. दीड वर्षाच्या कोरोना कालावधीत थकबाकी वसुलीची मोहीम संथ पडली होती. संक्रमण कमी झाल्याने मालमत्ता कर विभाग पुन्हा ॲक्शन मोडवर आला आहे.
जप्ती व लिलाव कारवाई करताना मालमत्ताधारकांना वारंवार संधी दिली जाते. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास संबंधितांच्या मालमत्ता लिलावात काढल्या जातात. लिलावाला प्रतिसाद न मिळाल्यास थकबाकीदारांच्या मालमत्ता मनपाच्या नावावर केल्या जात आहेत. अशा १३८ मालमत्ता मनपाच्या नावावर करण्यात आलेल्या आहेत.
कारवाई टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी संबंधित झोन कार्यालयांशी संपर्क साधून मालमत्ता कर ३१ डिसेंबर २०२१पूर्वी जमा करावा, तसेच थकबाकी तातडीने जमा करावी, असे आवाहन मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी केले आहे.
....जोड आहे.....