वरुडच्या शेतकऱ्याची जलालखेड्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 08:11 PM2019-03-15T20:11:17+5:302019-03-15T20:12:17+5:30
सरकारच्या धोरणामुळे व कर्जाच्या डोंगरामुळे वरुड तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्याने जलालखेडा येथे येऊन विष प्राशन करून आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (जलालखेडा ): सरकारच्या धोरणामुळे व कर्जाच्या डोंगरामुळे वरुड तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्याने जलालखेडा येथे येऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार वरुड तालुक्यातील गोरेगाव येथील प्रमोद बलदेव पांडे (३५) यांनी विषप्राशन करून जलालखेडा शिवारातील विष्णुकांत मिश्रा यांच्या शेतात जाऊन झोपले. शेतात काम करणारा मुलगा जेव्हा गोठ्याजवळ आला तेव्हा त्याला अनोळखी व्यक्ती पडलेली दिसली. त्याने याबाबतची माहिती जलालखेडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता प्रमोद याने विषप्राशन केल्याचे दिसून आले. पोलिसांनी प्रमोदच्या मोबाईलवरून त्यांच्या नातेवाईकांना शोध लावला व घटनेची माहिती त्यांना दिली. प्रमोद यांच्याकडे ११ एकर शेती असून त्यांना तीन भाऊ आहेत. शेतीत सतत नापिकी व कर्जाचा वाढता डोंगर यामुळे ते त्रस्त होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी,नऊ वर्षांची मुलगी व सात वर्षांचा मुलगा आहे. घटनेचा तपास जलालखेड्याचे ठाणेदार गजाजन तामटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.