‘त्या’ राखीला तिचा ‘स्पर्श’ होता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:13 AM2018-08-27T10:13:43+5:302018-08-27T10:14:09+5:30
१२ दिवसांपासून संघर्षात्मक जीवन जगत असलेल्या आपल्या लेकीला आणि बहिणीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये म्हणून ‘त्या’ राखीला...फक्त तिचा स्पर्श घेत ‘त्याने’ आपल्या मनगटावर आईच्या आणि छोट्या ताईच्या हाताने राखी बांधून घेतली.
अभय लांजेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: रक्षाबंधन...भाऊ-बहिणींच्या प्रेमळ नात्यांचा आनंदी क्षण... या क्षणाला वाात्सल्यमूर्ती मोठ्या बहिणींनी आणि खोडकर लाडक्या बहिणींनी आपल्या भावांच्या मनगटावर रेशीमधागा बांधला. हे चित्र सर्वत्र असले तरी ‘त्या’ पीडितेसाठी आणि तिच्या लाडक्या भावासाठी आजचे रक्षाबंधन ‘न भूतो न भविष्यती’ ठरावे आणि कुणाच्याही वाट्याला असले दु:ख येऊच नये, हीच प्रार्थना! कारण १२ दिवसांपासून संघर्षात्मक जीवन जगत असलेल्या आपल्या लेकीला आणि बहिणीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये म्हणून ‘त्या’ राखीला...फक्त तिचा स्पर्श घेत ‘त्याने’ आपल्या मनगटावर आईच्या आणि छोट्या ताईच्या हाताने राखी बांधून घेतली. हा क्षण अत्यंत भावूक आणि अश्रूंना वाट मोकळी करून देणारा होता.
उमरेड वेकोलि क्षेत्रातील गोकुल खदान येथे २४ वर्षीय वेकोलि महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्काराचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. १४ आॅगस्टच्या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले आहे. कुटुंबीय अक्षरश: मानसिकदृष्ट्या खचले आहे. घटनेपूर्वीच ‘त्या’ पीडितेने रक्षाबंधनाची पूर्वतयारी केली होती. आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी ‘तिने’ रेल्वेचे आरक्षणही करून ठेवले होते. तत्पूर्वीच ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. आजच्या घडीला ‘ती’ उपचारास हळूवार प्रतिसाद देत असली तरी, तिची प्रकृती स्थिरावली नाही. ती बोलू शकत नाही. केवळ हालचालीची भाषा तिला थोडीफार कळते. या नाजूक क्षणाला तिला कोणताही त्रास होऊ नये याची दक्षताही कुटुंबीय आणि डॉक्टर घेत आहेत. अशातच आज रक्षाबंधनाचा दिवस उजाडताच पीडितेच्या भावाने आज रक्षाबंधन असल्याची जाणीव करून दिली. लागलीच तिनेही आपल्या भावाला प्रतिसाद दिला. क्षणातच त्याने आपल्याजवळील राखीला तिचा ‘स्पर्श’ घेतला. बाहेर येत आई आणि ताईच्या हाताने ती राखी मनगटावर बांधून घेतली. यावेळी सारेच गहिवरले होते. कुणाच्याही वाट्याला असले रक्षाबंधन येऊ नये, असाच वाटणारा हा प्रसंग.
‘आपला माणूस’
आज रक्षाबंधनाच्या क्षणाला ‘त्या’ पीडित बहिणीने आपल्या लाडक्या भावाला राखी बांधली असेल की नाही, या प्रश्नाने ‘तो’ अस्वस्थ होता. या अतिशय गंभीर प्रसंगी ‘त्या’ भावाची काय अवस्था असेल, असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात आले आणि लागलीच आपल्या सख्ख्या बहिणीच्या हाताने राखी न बांधताच अनेकांच्या मदतीला धावणारा ‘आपला माणूस’ नागपूरच्या खासगी रुग्णालयात पोहोचला. ‘त्या’ माणसाने पीडितेच्या कुटुंबीयांना आपुलकीने विचारपूस केली. सोबतच मला पीडितेचा भाऊ म्हणून तुमच्याकडून राखी बांधायची आहे, अशी इच्छा पीडितेच्या आईजवळ व्यक्त केली. त्या मायमाऊलीने अश्रूंना वाट मोकळी करून देत ‘त्या’ माणसाच्या मनगटावर राखी बांधली.