धो-धो बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 10:58 PM2018-07-06T22:58:32+5:302018-07-06T23:00:29+5:30
रात्री रिमझिम बरसलेल्या पावसाने शुक्रवारला सकाळपासून जोरदार हजेरी लावली. या संततधार पावसामुळे मोहाडी तालुक्यातून वाहणारी सूर नदी तुडूंब भरून वाहत आहे तर लाखांदूर मासळ परिसरातील रोवणी पाण्याखाली सापडली आहे. धो-धो पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रात्री रिमझिम बरसलेल्या पावसाने शुक्रवारला सकाळपासून जोरदार हजेरी लावली. या संततधार पावसामुळे मोहाडी तालुक्यातून वाहणारी सूर नदी तुडूंब भरून वाहत आहे तर लाखांदूर मासळ परिसरातील रोवणी पाण्याखाली सापडली आहे. धो-धो पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सकाळी १० वाजताच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसाने तासभर हजेरी लावली. त्यानंतर काहीसा उघाड दिला आणि दुपारी व सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत तारांबळ उडविली. या पावसामुळे शहरातील नाल्या तुंबून वाहत होत्या. या पहिल्याच पावसाने भंडारा नगर पालिकेची पोलखोल केली आहे. नाल्यामधील कचरा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाविरूद्ध जनतेमध्ये असंतोष पसरला आहे.
मासळ परिसरात पऱ्हे पाण्याखाली
मासळ : काल रात्रीपासून मुसळधार पावसाने लाखांदूर तालुक्यासह मासळ परिसराला चांगलेच झोडपले. परिणामी, सामान्य जनजीवन ठप्प झाले आहे. या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. खोलगट भागात पाणी साचले आहे. पेरणी विलंबाने सुरू झाल्यामुळे रोवणीही उशिरा होत आहे. या पावसाने आठ दिवसात रोवणी योग्य होणारे धानाचे पऱ्हे पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.
आणखी दोन दिवस हे पऱ्हे पाण्यात राहिले तर पºहे सडण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ओलीताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीचा बेत आखला होता आता त्यांना रोवणीसाठी दोन दिवसपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. महसूल विभागानुसार पावसाची नोंद ७२ मिली एवढी करण्यात आली असून पाऊस येण्याची शक्यता आहे. पावसाने शाळेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घट झाली आहे.
पवनारा परिसरात पाणीच पाणी
पवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा परिसरात शुक्रवारला सकाळपासून जोरदार पावसामुळे मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. संततधार पावसामुळे बहुतांश ठिकाणचे पऱ्हे पाण्याखाली आले. ४० टक्के पºहे सडण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवले आहे. पेरणीसाठी पुन्हा बियाणे कुठून आणायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
लोहारा परिसरात जोरदार पाऊस
जांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील लोहारा व जांब, कांद्री परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आनंदी झाले आहेत. यावर्षीचा हा पहिलाच चांगला पाऊस पडल्याने शेतकरी मशागतीच्या कामाला जोमाने लागलेला आहे. कृषीपंपधारक शेतकरी धानाच्या रोवणीसाठी सज्ज झाले असून आता रोवणीला प्रारंभ होणार आहे.
पवनी तालुक्यात अतिवृष्टी
गुरूवार रात्रीपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. कालचा सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्यात झाला असून ११४.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे पवनी तालुक्यात जिकडे-तिकडे पाणीच पाणी दिसत आहे.
सरासरी ४० मि.मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात झालेल्या एकूण पावसाची २८५.५ मि.मी. इतकी नोंदविण्यात आलेली असून सरासरी ४०.८ मि.मी. ईतकी आहे. सर्वात कमी १३.२ मि.मी. पाऊस मोहाडी तालुक्यात बरसला.
पाऊस कुठे, किती?
तालुका पाऊस
भंडारा 34.1 मि.मी.
मोहाडी 13.2 मि.मी.
तुमसर 48.0 मि.मी.
पवनी 114.8 मि.मी.
साकोली 16.4 मि.मी.
लाखांदूर 42.2 मि.मी.
लाखनी 16.8 मि.मी.
एकूण 285.5 मि.मी.
सरासरी 40.8 मि.मी.