गुंडगिरी करणाऱ्यांची भररस्त्यावर धुलाई
By admin | Published: September 1, 2015 03:29 AM2015-09-01T03:29:34+5:302015-09-01T03:29:34+5:30
अपघातग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करीत गुंडगिरी करणाऱ्याची संतप्त पोलिसांनी जोरदार धुलाई केली. श्याम
नागपूर : अपघातग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करीत गुंडगिरी करणाऱ्याची संतप्त पोलिसांनी जोरदार धुलाई केली. श्याम टॉकीज मार्गावर रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. विशेष म्हणजे, ज्या पोलीस शिपायावरून रस्त्यावर महाभारत घडले, त्या पोलीस शिपायाने मात्र भीतीपोटी तक्रार देण्याचे टाळले. सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री कोतवाली ठाण्याचा एक पोलीस शिपाई साध्या वेशात दुचाकीने श्याम टॉकीज मार्गाने जात होता. त्याला एका भरधाव कारचालकाने कट मारला. पोलीस शिपायाने त्या कारचालकाला रोखत दम दिला आणि ‘व्यवस्थित ड्रायव्हिंग करण्याचा सल्लाही दिला. साध्या वेशात असल्यामुळे कारचालकाने पोलीस शिपायाला ओळखले नाही. त्यामुळे त्याला दाद न देता त्याच्याशी वाद घातला. वर्दळीचा मार्ग असल्यामुळे अल्पावधीतच तेथे मोठी गर्दी जमली. पोलिसांचा आवाज चढल्याचे पाहून कारचालक आणि अन्य काहींनी या शिपायाला मारहाण केली. मात्र, त्यांनी पोलिसांना प्रतिसाद न देता गुंडगिरी सुरूच ठेवली. त्यामुळे अभिनाश कुमार यांनी रस्त्यावर गुंडागर्दी करणाऱ्यांना हुसकावण्याचे आदेश दिले. ते ऐकताच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी गुंडगिरी करणाऱ्यांच्या शरीराच्या मागच्या भागावर दंडे हाणले. त्यामुळे दोन मिनिटातच घटनास्थळावरील गर्दी पांगली. पोलिसांशिवाय तेथे केवळ कट मारून वाद घालणारा कारचालकच तेवढा शिल्लक होता. दरम्यान, ज्याच्यासाठी हे सर्व घडले, तो पोलीस शिपाई या घटनेची तक्रार देण्याऐवजी तेथून सटकल्यामुळे तक्रार कुणाची घ्यावी, असा पोलिसांना प्रश्न पडला. (प्रतिनिधी)