मानवी तस्करी करणाऱ्यांची धुलाई
By admin | Published: March 9, 2017 02:21 AM2017-03-09T02:21:32+5:302017-03-09T02:21:32+5:30
महिलांना मध्य प्रदेश- राजस्थानमध्ये नेऊन त्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील दोघांना संतप्त जमावाने पकडले.
दोघांना नागरिकांनी पकडले : पोलिसांनी काही वेळेतच सोडले
नरेश डोंगरे नागपूर
महिलांना मध्य प्रदेश- राजस्थानमध्ये नेऊन त्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील दोघांना संतप्त जमावाने पकडले. त्यांची बेदम धुलाई केली. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या हवालीही केले. यातील एका जणावर महिलेच्या अपहरणाचा, छेडखानीचा आणि बालकाच्या हत्येचा गंभीर आरोप असताना त्याला आणि त्याच्या साथीदाराला बजाजनगर पोलिसांनी एनसी करून सोडून दिल्याची खळबळजनक बाब पुढे आली आहे. पोलिसांनी एवढ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला काही वेळेतच कोणत्या कारणामुळे मोकळे केले, ते कळायला मार्ग नसून, यासंबंधाने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
काचीपुऱ्यात राहणाऱ्या एका गरीब परिवारातील महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्या तरुण मुलीला राजस्थान तसेच त्यांच्या कळमन्यातील टोळीने विकले. तिला तिकडे नेल्यानंतर तिच्यावर अत्याचार सुरू झाले. दरम्यान, तिला एक मुलगाही झाला. तिच्यानंतर आरोपींनी तिच्या लहान बहिणीवर नजर रोखली. काही जणांना पैसे देऊन तिचेही दोन वर्षांपूर्वी लग्न लावण्यात आले आणि तिलाही राजस्थानमध्ये नेण्यात आले. ज्याच्यासोबत तिचे लग्न झाले ती व्यक्ती या तरुणीची चांगली देखभाल करू लागली. तिला मुलगाही झाला. दरम्यान, पहिल्या तरुणीवर अत्याचार वाढला. अचानक ती काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. त्यामुळे तिचा चिमुकला मुलगा या तरुणीने (मावशीने) स्वत:च्या घरी आणला. दरम्यान, तरुणी बेपत्ता झाल्यानंतर आरोपी आणि त्याचे साथीदार खवळले. त्यांनी या तरुणीला छळणे सुरू केले. एका रात्री ही तरुणी आपल्या चिमुकल्याला आणि बहिणीच्या मुलाला घेऊन निद्रिस्त झाली. ती गाढ झोपेत असताना आरोपीने तिच्या बहिणीच्या चिमुकल्याला उचलून नेले. सकाळी तरुणी उठली तेव्हा तिला तिचा भाचा दिसला नाही. त्यामुळे तिने शोधाशोध केली असता आरोपीने कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिला त्याची हत्या करून जमिनीत पुरल्याचे सांगितले. तू ओरडल्यास तुला आणि तुझ्या मुलाला जीवे ठार मारू, अशी धमकीही दिली. त्यामुळे हादरलेली ही तरुणी गप्प बसली.
दरम्यान, पीडित तरुणीने कसेबसे नागपूर गाठले. ती माहेरी आल्यानंतर आरोपी एका साथीदारासह तिच्या मागावर रविवारी दुपारी १२ वाजता काचीपुऱ्यात पोहचला. त्याने तिला रस्त्यावर पकडून सोबत चलण्यास सांगितले. धमकीही दिली. तरुणीने आरडाओरड केल्यामुळे नागरिक गोळा झाले. त्यांनी दोघांनाही पकडून त्यांची बेदम धुलाई केली.
काचीपुऱ्यातील एका सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेसह मोठा जमाव ठाण्यात होता.
बजाजनगर पोलिसांनी त्यांना रात्री ९ वाजेपर्यंत बसवून ठेवल्यानंतर घरी पाठविले. आरोपींवर कडक कारवाई करतो, असे सांगून त्यांना जायला सांगितले. त्यानंतर आरोपींसोबत काय बोलणी झाली कळायला मार्ग नाही. मानवी तस्करी, मुलाचे अपहरण, हत्या अशा अनेक गंभीर आरोप असलेल्या आरोपींना पोलिसांनी एनसीची कारवाई करून मोकळे केले.
प्रकरण पोलीस उपायुक्तांकडे
सोमवारी दुपारी हा प्रकार कळल्यानंतर महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांना हे प्रकरण सांगितले. मासिरकर यांनी याबाबत बजाजनगर ठाण्यातील संबंधितांची कानउघाडणी करून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. पीडित तरुणीलाही विचारपूस केली. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांसोबत संपर्क साधून त्यांना मुलाच्या अपहरण आणि कथित हत्येबाबतची माहिती कळविली. हे प्रकरण उपायुक्त मासिरकर यांच्याकडे गेल्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, बुधवारी या प्रकरणात आपण स्वत: चौकशी करणार आहोत, अशी माहिती उपायुक्त मासिरकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मायलेकी बेपत्ता
विशेष म्हणजे, या प्रकरणात पीडित तरुणीची बहीणच नव्हे तर आईही बेपत्ता आहे. मानवी तस्करी अन् महिलांची विक्री करणाऱ्या मध्य प्रदेश राजस्थान, गुजरातमधील टोळीचे नागपूर कनेक्शन अनेकदा उघड झाले आहे. त्यांनी येथील अनेक महिला, मुलींना वेगवेगळ्या प्रांतात नेऊन विकले आहे. त्यांची सुटका करून आरोपींना अटक करण्याचे प्रकारही कळमना, गिट्टीखदान आणि अन्य पोलीस ठाण्यात दाखल आहेत. असे असताना या टोळीतील आरोपींना बजाजनगर पोलिसांनी सोडून देणे, धक्कादायक व संशयास्पदच नव्हे तर संतापजनकही ठरले आहे.