काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी वासनिक, पटोले एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 08:10 AM2022-06-08T08:10:00+5:302022-06-08T08:10:02+5:30
Nagpur News नागपूर, भंडारा व बुलडाणा या जिल्ह्याचे चित्र पाहता अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकत्र येत रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे.
कमलेश वानखेडे
नागपूर : काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत बूथपासून ब्लॉकपर्यंत दिग्गज नेत्यांनी रस घेतला आहे. जवळच्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत प्रतिनिधित्व देता यावे व जिल्हा काँग्रेस समिती ताब्यात ठेवता यावी, यासाठी नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. नागपूर, भंडारा व बुलडाणा या जिल्ह्याचे चित्र पाहता अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकत्र येत रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे.
पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीत ब्लॉक निवडणूक अधिकारी (बीआरओ)ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. बीआरओच्या माध्यमातूनच बूथ व ब्लॉक स्तरावरील निवडणुका पार पाडल्या जातात. तसेच जिल्हास्तरावर व प्रदेशवर पाठविण्यात येणाऱ्या प्रतिनिधी यादीवरही बीआरओचीच स्वाक्षरी अंतिम असते. त्यामुळे नागपूर, भंडारा व बुलडाणा या तीन जिल्ह्यांत मुकुल वासनिक व नाना पटोले यांनी एकत्र येत विश्वासातील लोकांना बीआरओ म्हणून नेमल्याचे समोर आले आहे. नागपूर ग्रामीणसाठी सर्व बीआरओ बुलडाणा येथील आहेत. नागपूर शहरसाठी सर्व बीआरओ भंडाऱ्याचे आहेत, तर बुलढाणा येथे नागपूर ग्रामीण व शहरातील बीआरओ देण्यात आले आहेत.
बीआरओंना सूचना, आदेशाशिवाय सही करू नका
- बीआरओने १० जूनपर्यंत बूथ अध्यक्षाची निवडणूक पार पाडून व बूथ प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. तर १० ते ३० जूनदरम्यान ब्लॉक अध्यक्ष व ब्लॉक कार्यकारिणीची निवडणूक आटोपायची आहे. मात्र, जिल्ह्यावर तसेच प्रदेशवर पाठविण्यात येणाऱ्या कोणत्याही यादीवर वरून आदेश आल्याशिवाय स्वाक्षरी करू नका, असे आदेश बीआरओ यांना देण्यात असल्याची माहिती आहे.
राऊत- केदार यांना रोेखण्यासाठी रणनीती
- ब्लॉक काँग्रेस कमिटी ताब्यात घेण्यासाठी ग्रामीणमध्ये क्रीडामंत्री सुनील केदार सक्रिय झाले आहेत. प्रत्येक ब्लॉकच्या निवडणूक प्रक्रियेवर ते लक्ष ठेवून आहेत. तर पालकमंत्री नितीन राऊत हे त्यांच्या उत्तर नागपूर मतदारसंघासह पूर्व नागपूर, मध्य नागपूर व दक्षिण नागपुरातील काही निवडक ब्लॉकवर आपल्या कार्यकर्त्यांसाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, या मंत्री जोडीच्या वाट्याला कमीत कमी ब्लॉक अध्यक्ष यावे यासाठी वासनिक-पटोले समर्थकांनी एकत्र येत रणनीती आखली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.