स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चावर नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 10:55 AM2021-11-11T10:55:02+5:302021-11-11T11:03:48+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचार खर्चाबाबत कोणतीही स्पष्टता नसली तरी निवडणुकीत होणाऱ्या खर्चावर नजर राहणार असून, बल्क एसएमएस किंवा समाजमाध्यमांच्या वापराची माहिती उमेदवारांकडून घेण्यात येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाकरिता निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. प्रचार खर्चाबाबत कोणतीही स्पष्टता नसली तरी या निवडणुकीत उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चावर नजर ठेवली जाईल. तसेच, बल्क एसएमएस किंवा सोशल मीडियाच्या वापराची माहिती निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
संपूर्ण निवडणुकीत कोरोना प्रोटोकॉलवर विशेष लक्ष राहणार असून महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद सदस्य व पंचायती समिती सभापती मतदार आहेत. सध्या यांची संख्या ५६२ निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता निवडणुकीत पक्षांकडून होणाऱ्या प्रचाराच्या वेळी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचार खर्चाबाबत कोणतीही स्पष्टता नसली तरी निवडणुकीत होणाऱ्या खर्चावर नजर राहणार असून, बल्क एसएमएस किंवा समाजमाध्यमांच्या वापराची माहिती उमेदवारांकडून घेण्यात येईल. या निवडणुकीबाबत सर्व राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग व माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.
अशी आहे मतदारसंख्या (संभावित)
महानगरपालिका १५५ (१५० नियुक्त व ५ नामनिर्देशित)
जिल्हा परिषद ५८
नगर पा. व न. पंचायत ३३६
पंचायत समिती सभापती १३
निवडणूक कार्यक्रम
१६ ते २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येईल
२४ नोव्हेंबरला अर्ज छाननी
२६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येईल
१० डिसेंबरला मतदान
१४ डिसेंबरला मतमोजणी