परीक्षार्थ्यांवर ‘कॅमेरा’ ठेवणार ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:09 AM2021-03-23T04:09:08+5:302021-03-23T04:09:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिवाळी परीक्षांसाठी नियमावली अखेर जारी केली आहे. विद्यार्थी लॅपटॉप, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिवाळी परीक्षांसाठी नियमावली अखेर जारी केली आहे. विद्यार्थी लॅपटॉप, संगणक, स्मार्टफोनवरून ‘वेब बेस्ड’ परीक्षा देऊ शकणार आहेत. परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाइलचा फ्रंट कॅमेरा किंवा वेबकॅमेरा सुरू ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हालचाली टिपण्यात येणार आहेत. जर विद्यार्थी जागेवरून हलला तर लगेच त्याची सर्व्हरवर नोंद होणार आहे.
हिवाळी परीक्षांना २५ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात बीएसस्सी, बीकॉमसह विविध परीक्षा होणार आहेत. मात्र ऑनलाइन परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने होतील हे स्पष्ट झाले नव्हते. ‘अॅप’ऐवजी विशेष संकेतस्थळाच्या माध्यमातून परीक्षा घेण्याबाबत निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला. परीक्षांसाठी तांत्रिक सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ‘प्रोमार्क’ला देण्यात आली.
परीक्षेच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना ‘ऑनलाइन’ परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉप व ‘स्मार्टफोन’चा कॅमेरा सुस्थितीत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र महाविद्यालयांतून घेता येणार आहे. त्यावर ‘युझर आयडी’व पासवर्ड असेल. विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्यास त्याची नोंद सर्व्हरवर होईल व त्यांना परीक्षेत अपात्र ठरविण्यात येईल.
बहुपर्यायी प्रश्न राहणार
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना बहुपर्यायी उत्तरे असलेल्या प्रश्नांना सोडवावे लागणार आहे. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. एक प्रश्न झाल्यानंतर ‘सेव्ह’ आणि मग ‘नेक्स्ट’ असे क्लिक करावे लागेल. जर एखादे उत्तर येत नसेल तर ‘स्कीप’च्या माध्यमातून पुढील प्रश्नावर जाता येईल. विद्यार्थी संबंधित प्रश्नावर नंतर जाऊ शकतील. विशेष म्हणजे विद्यार्थी परीक्षा सुरू असताना भाषादेखील बदलू शकतील. सर्व प्रश्न सोडवून झाल्यानंतर त्यांना ‘सबमिट’ करावे लागेल.
परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे
- लॅपटॉप, मोबाइल चार्ज पूर्णपणे चार्ज असावे
-इंटरनेट कनेक्टिव्हिटी अगोदर तपासून घ्यावी
- परीक्षेसाठी बसण्याच्या जागी योग्य प्रकाश हवा
- वेबकॅम किंवा फ्रंट कॅमेरा चेहऱ्यावर फोकस असावा
-एमएस टीम्स, झूम, गुगल मीट यासारखे अॅप्स अगोदर डिलिट करावे.
-मॉक परीक्षा देऊन सराव करावा
कारवाई टाळा
- परीक्षेदरम्यान कुठलेही बोलणे व हालचाल टाळावी
- चेहऱ्याला मास्क, केस, हात यांनी झाकू नये
- हेडफोन, ईअरबड्सचा उपयोग गैरप्रकार मानण्यात येईल.