बार कॉन्सिलच्या निवडणुकीत प्रथमच सोशल मीडियावर वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:14 AM2018-02-13T11:14:46+5:302018-02-13T11:17:22+5:30
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीत व्हॉटस् अॅप, फेसबुक, टिष्ट्वटर इत्यादी सोशल मीडियावर प्रथमच सूक्ष्म नजर ठेवली जाणार आहे.
राकेश घानोडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीत व्हॉटस् अॅप, फेसबुक, टिष्ट्वटर इत्यादी सोशल मीडियावर प्रथमच सूक्ष्म नजर ठेवली जाणार आहे. उमेदवार, उमेदवारांचे समर्थक, मतदार वकील व इतर जबाबदार व्यक्तीने सोशल मीडियाद्वारे नियमांचा भंग केल्याचे सिद्ध झाल्यास दोषींवर व्यावसायिक गैरवर्तनासह अन्य कठोर करवाई केली जाणार आहे.
येत्या २८ मार्च रोजी कौन्सिलची निवडणूक होणार आहे. कौन्सिलची मागील निवडणूक २०१० मध्ये झाली होती. त्यात निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी-२०१५ मध्येच संपला. परंतु, त्यानंतर विविध कारणांमुळे निवडणूक लांबली. यादरम्यान तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे प्रत्येकाकडे स्मार्ट फोन्स आले आहेत. परिणामी, सोशल मीडियाचा अत्यंत झपाट्याने प्रसार झाला आहे. या प्रभावी माध्यमाचा वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोग केला जात आहे. ही बाब लक्षात घेता कौन्सिलच्या निवडणुकीत प्रथमच सोशल मीडियाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. निवडणुकीत सोशल मीडियाचा दुरुपयोग होऊ नये यासाठी आचार संहितेमध्ये कडक नियमांचा समावेश करण्यात आला आहे.
सोशल मीडियाच्या दुरुपयोगासह गैरवर्तन, नियमबाह्यपणे निवडणुकीचा प्रचार करणे व अन्य अवैध कृतीवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक निरीक्षक समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती निवडणुकीसंदर्भातील तक्रारी स्वीकारणार आहे. तसेच, तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी तीन वकिलांचे निवडणूक न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवाराला, त्यांच्या समर्थकांना, वकिलांना किंवा अन्य जबाबदार व्यक्तीला प्रतिस्पर्धी उमेदवार, मतदार वकील, न्यायव्यवस्था, बार कौन्सिल इत्यादीबाबत अवमानजनक व खोट्या अफवा पसरविण्यासाठी, चुकीची भाषणे पसरविण्यासाठी, असभ्य प्रकाशने करण्यासाठी आणि असभ्य व खोटे आरोप करण्यासाठी सोशल मीडियाचा, मोबाईल फोन्सचा व अन्य विद्युत उपकरणांचा वापर करता येणार नाही. बॅलट पेपरची गोपनियता व मत मोजणी प्रक्रिया प्रभावित करण्यासाठी मोबाईल फोन्स व अन्य विद्युत उपकरणांचा उपयोग करता येणार नाही. होर्डिंग व बॅनर्स लावणे, उमेदवारीची जाहिरात करणे, आश्वासन प्रसिद्ध करणे, अन्य उमेदवार व संस्थेविरुद्ध अवमानजनक आरोप करणे, मते मागण्यासाठी जाहीरनामा प्रकाशित करणे यालाही मनाई करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधितावर व्यावसायिक गैरवर्तनासह अन्य कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्वागतार्ह पाऊल
बार कौन्सिलचा निर्णय स्वागतार्ह आहे. निवडणूक पारदर्शी होण्यासाठी अशी भूमिका घेणे आवश्यक झाले होते. अलीकडे सोशल मीडियाचा प्रचंड दुरुपयोग होत आहे. त्यामुळे कौन्सिलच्या निवडणुकीत सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची मागणी केली होती. त्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये कौन्सिलला पत्र लिहिले होते.
- अॅड. अनिल गोवारदीपे, माजी उपाध्यक्ष,
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा.