नजर ठेवून चोराने भरदिवसा निवृत्त कर्मचा-याला लुटले
By admin | Published: January 3, 2017 02:30 PM2017-01-03T14:30:28+5:302017-01-03T14:30:28+5:30
नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या निवृत्त कर्मचा-याला मारहाण करून एकाने 32 हजार 500 रुपये लुटले.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3 - मध्यवर्ती कारागृहाच्या निवृत्त कर्मचा-याला मारहाण करून एकाने 32 हजार 500 रुपये लुटले. सोमवारी दुपारी ही घटना घडली. नानाजी धनाजी इंगळे असे तक्रारकर्त्या व्यक्तीचे नाव आहे. इंगळे गेल्या वर्षी कारागृह सेवेतून निवृत्त झाले. सध्या ते कारागृहाशेजारी असलेल्या कर्मचारी निवासातच राहतात. त्यांना घराचे बांधकाम करायचे असल्यामुळे त्यांनी सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्रमधून 24 हजार रुपये काढले.
त्यांच्याजवळ 8500 रुपये होते. अशा प्रकारे एकूण 32, 500 रुपये खिशात घालून ते सायकलने आपल्या निवासस्थानाकडे निघाले. कारागृहाच्या मुख्य दारातून विश्रामगृहाजवळच्या मैदानापासून घराकडे जात असताना अचानक एकाने त्यांना रोखले. मारहाण करुन आरोपीने इंगळे यांच्या खिशातील 32 हजार 500 रुपयांची रक्कम हिसकावून घेतली. झटापटीत इंगळे यांचा खिसाही फाटला. यानंतर या आरोपी बाईकवर फरार झाला.
इंगळे यांनी आरडाओरड करीत कारागृहासमोरच्या रक्षकांना ही माहिती दिली. मात्र, ते रस्त्यावर येईपर्यंत आरोपी नजरेआड झाला होता. नेहमी कडेकोट बंदोबस्त असणा-या कारागृहाजवळ भरदिवसा ही लुटमारीची घटना घडल्याने खळबळ उडाली.
बँकेतूनच केला पाठलाग
इंगळे यांनी धंतोली ठाण्यात माहिती कळवताच पोलीस उपनिरीक्षक गजानन कांगणे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी बँकेतूनच इंगळे यांच्यावर नजर ठेवून होता, हे स्पष्ट झाले. त्याने तेथून पाठलाग करुन इंगळेंना निर्जन ठिकाणी गाठले आणि त्यांची रक्कम हिसकावून घेतली. इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मोटरसायकलवर मागे बिना नंबरची प्लेट होती. त्यामुळे हा गुन्हेगार सराईत असावा, असा अंदाज काढण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी लुटमारीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.