रंगपंचमीत २५ कोटींच्या व्यवसायावर पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:07 AM2021-03-28T04:07:59+5:302021-03-28T04:07:59+5:30
नागपूर : रंगपंचमी घरीच साजरी करा आणि कडक लॉकडाऊनच्या प्रशासनाच्या आवाहनानंतर बाजारात व्यापाऱ्यांमध्ये निरुत्साह पसरला आहे. अखेरच्या दोन ते ...
नागपूर : रंगपंचमी घरीच साजरी करा आणि कडक लॉकडाऊनच्या प्रशासनाच्या आवाहनानंतर बाजारात व्यापाऱ्यांमध्ये निरुत्साह पसरला आहे. अखेरच्या दोन ते तीन दिवसात रंगपंचमीच्या वस्तूंच्या विक्रीवर पाणी फेरल्या गेले असून जवळपास २५ कोटींच्या उलाढालीवर संक्रांत आली आहे.
यंदा रंगपंचमी सण २९ मार्चला साजरा होणार आहे. त्याकरिता व्यापारी पूर्वीच तयारी करतात. डिसेंबरअखेरपासून आणि जानेवारी महिन्यात वस्तूंचे ऑर्डर देतात. तो माल फेब्रुवारी महिन्यात व्यापाऱ्यांकडे पोहोचतो. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे रुग्ण फारसे नव्हते. त्यामुळे रंगपंचमी उत्तमरीत्या साजरी होण्याचे संकेत मिळाल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात माल मागविला. पण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रकोप वाढताच व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्के वस्तूंची विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारात पिचकारी, मुखवटे, चेहरे, केस, रंग, गुलाल या मुख्य वस्तूंना मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोर जावे लागत आहे. यंदाच्या रंगपंचमीवर कोरोनाचे संकट दिसत आहे.
इतवारी जिल्ह्याची मोठी बाजारपेठ
नागपूर जिल्ह्यातील तहसील आणि ग्रामीण भागात इतवारी येथून मालाचा पुरवठा होतो. अनेक व्यापारी सणाच्या सात दिवसांपूर्वी वस्तूंची खरेदी करतात. पण यंदा रंगपंचमी साजरी होणार नसल्याने ठोक व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात माल पडून आहे. त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार असल्याची माहिती राजू माखिजा यांनी दिली.
गुलालाचे सर्वाधिक उत्पादन नागपुरात
रंगपंचमी अथवा अन्य सणांसाठी नागपुरात विविधरंगी गुलालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. नागपूर गुलालाची मोठी बाजारपेठ बनली आहे. त्या कारणाने उत्पादकही वाढले आहेत. ही उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. पण यंदा अन्य जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी गुलालाचे ऑर्डर न नोंदविल्याने आणि रंगपंचमी सणावर प्रतिबंध आल्याने यंदा कोट्यवधींचा व्यवसाय डबघाईस आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
पिचकारीचे मोठे मार्केट
नागपुरात विविध आकार आणि प्रकारातील पिचकारीचे मार्केट जवळपास १० कोटींचे आहे. पण यंदा पालक मुलांसाठी पिचकारी खरेदीसाठी बाजारात आलेच नाही. याशिवाय रविवार शेवटचा दिवस असतानाही बाजारात उत्साह दिसून येत नाही. याशिवाय किरकोळ व्यापाऱ्यांनीही खरेदी थांबविली आहे. फेब्रुवारीत जेवढा व्यवसाय झाला तेवढीच उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. नंतर मागणी नगण्य आहे. यंदा अनेकांना स्टॉक घरीच ठेवावा लागणार आहे. कोरोना लॉकडाऊनचे संकट डोक्यावर घोंगावत असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.