रेल्वे स्थानकावर बनली नहर; मोरभवनात बनला तलाव

By नरेश डोंगरे | Published: July 20, 2024 06:47 PM2024-07-20T18:47:17+5:302024-07-20T18:51:40+5:30

दमदार पावसामुळे रेल्वे आणि एसटी प्रशासनाची त्रेधातिरपट : हजारो प्रवाशांनाही फटका, अनेकांचे नियोजन बिघडले

Water all over railway station; A lake was built in Morbhavan | रेल्वे स्थानकावर बनली नहर; मोरभवनात बनला तलाव

Water all over railway station; A lake was built in Morbhavan

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळाला जबरदस्त तडाखा दिला. रेल्वे स्थानकाच्या आतमधील ट्रॅक नहर बनले तर मोरभवन बस स्थानक परिसराला तलावाचे स्वरूप आले. या स्थितीमुळे दोन्ही प्रशासनाची अक्षरश: त्रेधातिरपट उडाली. प्रवाशांनाही प्रचंड त्रास झाला.

मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून यावर्षी आतापर्यंत नागपुरात दमदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे साऱ्यांनाच मुसळधार पावसाची प्रतिक्षा होती. मात्र, शनिवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस एवढा दमदार होता की त्याचा साऱ्यांनाच फटका बसला. रेल्वे आणि एसटी महामंडळाची तर या पावसामुळे अक्षरश: तारांबळ उडाली. रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये असलेले सर्वच्या सर्व ट्रॅक (रेल्वे रुळ) पाण्याखाली आले. अशा स्थितीत रेल्वे गाडीचे चाक घसरण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासन तातडीने एक्शन मोडवर आले.

विशेष म्हणजे, देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या चारही भागात रेल्वेगाड्या जातात आणि येतात. त्यासाठी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता (हावडा) या तीन लाईन आहेत. शनिवारी सकाळी ७ ते १० या वेळेत वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या या तीनही लाईनवर काही वेळेसाठी 'रेड सिग्नल्स' देण्यात आले. नागपूर शहराच्या जवळपास पोहचलेल्या सर्वच्या सर्व गाड्या आजुबाजूच्या स्थानकावर थांबविण्यात आल्या. मॅन अन् मशिनरीजचा वापर करून रुळावरील पाणी काढण्यात आले. त्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकारी 'ट्रॅक'वर आले आणि सुमारे १०. ३० च्या सुमारास रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामुळे हजारो प्रवाशांचे नियोजन बिघडले.

खबरदारीमुळे टळले कोट्यवधींचे नुकसान

एसटी महामंडळाच्या सीताबर्डीतील मोरभवन बस स्थानकाचा परिसर अक्षरश: तलाव बनला होता. गेल्या वर्षी २३ सप्टेंबरला मोरभवन स्थानकाची अशीच स्थिती झाली होती. बसस्थानकच नव्हे तर प्रांगणात उभ्या असलेल्या १३ बसेस पाण्यात बुडाल्या होत्या. त्यामुळे त्या निकामी होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले होते. तो धडा घेत एसटीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळीपासून स्थानकात उभ्या असलेल्या सर्वच्या सर्व बसेस बाहेर काढल्या. बसस्थानकातील संगणकांसह किंमती चिजवस्तू बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविल्या. मुक्कामी थांबलेल्या चालक-वाहकांसह अन्य स्टाफला तेथून बाहेर निघण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे स्थानकात प्रवाशांसाठी आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खुर्च्या तेवढ्या पाण्यात बुडाल्या. दुसरे मोठे नुकसान टळले.
 

२० हजारांवर एसटी प्रवाशांना फटका
नागपूर जिल्ह्यातील एसटीच्या २० हजारांवर प्रवाशांना मुसळधार पावसाचा फटका बसला. जिल्ह्यातील गावोगावी जाणाऱ्या एसटीच्या १३,००७ किलोमिटरमधील एकूण २१५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. एसटीची सर्वाधिक वाहतूक उमरेड आणि रामटेक तालुक्यात प्रभावित झाली. उमरेड आगारातून खेडोपाडी जाणाऱ्या ६८, तर काटोल आगारातून जाणाऱ्या ६२ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. इमामवाडा आगारातील ३१, गणेशपेठ आगारातील १२, वर्धमान नगर १२, सावनेर ११, काटोल १० आणि घाटरोड आगारातील ९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ज्यामुळे प्रवाशांची तीव्र गैरसोय झाली.
 

Web Title: Water all over railway station; A lake was built in Morbhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.