मेडिकलमध्ये पाण्याचे एटीएम : मंगळवारपासून एक रुपयात शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:31 PM2019-05-06T22:31:28+5:302019-05-06T22:32:32+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) रुग्णांची वाढती संख्या, नवे विभाग, नवे वॉर्ड यामुळे थोड्या अधिक प्रमाणात शुद्ध पाण्याच्या समस्येला सर्वांनाच तोंड द्यावे लागते. या समस्येवर मेडिकलच्या १९९३ च्या माजी विद्यार्थी संघटनेने कायम स्वरूपी तोडगा काढाला. मेडिकलला पाण्याचे ‘एटीएम’च भेट दिले. रुग्णांना केवळ एक रुपयामध्ये एक लिटर शुद्ध व थंड पाणी २४ तास मिळणार आहे. उद्या ७ मे पासून याची सुरुवात होणार आहे. परिणामी, पाण्यासाठी रुग्णांची धावाधाव थांबणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) रुग्णांची वाढती संख्या, नवे विभाग, नवे वॉर्ड यामुळे थोड्या अधिक प्रमाणात शुद्ध पाण्याच्या समस्येला सर्वांनाच तोंड द्यावे लागते. या समस्येवर मेडिकलच्या १९९३ च्या माजी विद्यार्थी संघटनेने कायम स्वरूपी तोडगा काढाला. मेडिकलला पाण्याचे ‘एटीएम’च भेट दिले. रुग्णांना केवळ एक रुपयामध्ये एक लिटर शुद्ध व थंड पाणी २४ तास मिळणार आहे. उद्या ७ मे पासून याची सुरुवात होणार आहे. परिणामी, पाण्यासाठी रुग्णांची धावाधाव थांबणार आहे.
मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडीला) तीन हजारावर रुग्ण उपचारासाठी येतात, तर १८००वर रुग्ण भरती असतात. प्रत्येक रुग्णासोबत एक किंवा दोन नातेवाईक असतात. या सर्वांना सोई पुरविण्यात मेडिकल प्रशासनाची तारांबळ उडते. अडचण जाते ती पाण्याची. मेडिकलला रोज ३० लाख लिटर पाण्याची गरज भासते. परंतु १५ ते १७ लाख लिटरवर पाणी मिळते. यामुळे उन्हाळ्यात व इतरही वेळी पाणी समस्या निर्माण होते. मेडिकल प्रशासन आपल्या परीने ही समस्या सोडविते. परंतु काही प्रमाणात शुद्ध पाण्याचा प्रश्न कायम राहतो. दरम्यान मेडिकलच्या माजी विद्यार्थ्यांची १९९३ ‘बॅच’चे हे २५वे वर्ष आहे. ही बॅच ‘रजत महोत्सव’ साजरा करीत आहे. या निमित्ताने संघटनेचे डॉ. अमित दिसावल, डॉ. यु. चांडक, डॉ. सुकेश झवर व डॉ. संजय बुले यांनी ‘पाण्याचे एटीएम’ उभारण्याचा निर्णय घेतला. अधिष्ठात्यांकडून याला मंजुरी मिळताच. डॉ. अमित दिसावल व डॉ. मुरारी सिंग यांनी ‘एटीएम’साठी जागेची पाहणी केली. शल्यक्रिया अपघात विभागाच्या बाजूला बंद असलेल्या पोलीस बुथच्या ठिकाणी हे एटीएम उभारण्यात आले. बुलडाणा अर्बन कोआॅपरेटिव्ह बँकेचे संचालक व या माजी विद्यार्थी संघटनेचे डॉ. झवर यांनी बँकेतर्फे दोन जलशुद्धीकरण यंत्र व वॉटर एटीएम बसविण्यासाठी पुढाकार घेतला. पाण्याचे एटीएम उभारण्याचे कार्य पूर्ण झाले. याचे अवलोकन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी केले. परंतु प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पाण्याची तपासणी करण्याचा सूचना दिल्या. दोन दिवसांपूर्वी पाण्याचा पॉझिटीव्ह अहवाल आला. यामुळे अक्षयतृतीयाचा दिवशी म्हणजे मंगळवारी पाण्याचे एटीएम सुरू होणार आहे. यामुळे रुग्ण व नातेवाईकांची थंड व शुद्ध पाण्याची समस्या निकाली निघण्याची शक्यता आहे.
२४ तास शुद्ध पाणी
रुग्णांना अद्ययावत सोई उपलब्ध करुन देण्याचा मेडिकलचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. माजी विद्यार्थ्यांचेही याला पाठबळ मिळते. नुकतेच १९९३ च्या माजी विद्यार्थी संघटनेने स्तुत्य कार्य करीत पाण्याचे ‘एटीएम’ भेट दिले. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना २४ तास शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आणखी भर पडली आहे.
-डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल