नागपूर जि.प.च्या सर्वसाधारण सभेत पेटले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:12 PM2019-05-06T22:12:06+5:302019-05-06T22:13:27+5:30

सोमवारची जि.प.ची सर्वसाधारण सभा पाणीप्रश्नावर चांगलीच वादग्रस्त ठरली. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असतानादेखील सभागृहात सत्तापक्षाकडून व अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत होती. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

Water burnt in the general meeting of Nagpur ZP | नागपूर जि.प.च्या सर्वसाधारण सभेत पेटले पाणी

नागपूर जि.प.च्या सर्वसाधारण सभेत पेटले पाणी

Next
ठळक मुद्देअधिकारी-पदाधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारची जि.प.ची सर्वसाधारण सभा पाणीप्रश्नावर चांगलीच वादग्रस्त ठरली. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असतानादेखील सभागृहात सत्तापक्षाकडून व अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येत होती. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी सांगितले की, पाणीटंचाई उपाययोजनेंतर्गत जिल्ह्याला तीन टप्प्यामध्ये ६२३ वर बोअरवेल मंजूर आहेत. आज निम्मा उन्हाळा संपुष्टात आल्यानंतरही जिल्ह्यात मंजूर बोअरवेलपेक्षा निम्म्याही बोअरवेलची कामे पूर्ण झाली नाहीत. केवळ १५१ इतक्याच बोअरवेलची कामे पूर्ण झाली आहेत. तर यातील बोटावर मोजण्याइतपतच बोअरवेलला हॅन्डपंप बसविण्यात आले असून, या बोअरवेलच्या पाण्याचा नाममात्र नागरिकांनाच फायदा होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व गोष्टीसाठी पदाधिकाऱ्यांसह अधिकारीही जबाबदार आहेत. अध्यक्षांनी भीषण टंचाई लक्षात घेता टंचाईच्या काळात एकही आढावा सभा घेतली नाही किंवा टंचाईग्रस्त गावे, तालुक्यांना अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी भेटी घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे होते. मात्र, त्यांच्याकडून ही कृती करण्यात आली नाही. पदाधिकाऱ्यांचेच दुर्लक्ष असल्यामुळे अधिकाऱ्यांनीही आपल्या मनमर्जीपणाने कामे सुरू ठेवलीत व याचा फटका म्हणजे ग्रामीण जनतेला पाण्यासाठी आता भटकंती करावी लागत आहे. यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख टाकळीकर यांनी आजवर टंचाई उपाययोजनेंतर्गत झालेल्या कामासोबतच करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सभागृहातील सदस्यांना दिली.
सदस्य चंद्रशेखर चिखले यांनी टंचाईच्या दृष्टिकोनातून जि.प.प्रशासनाने करावयाची उपाययोजना ही आज करण्यापेक्षा पूर्वीच का केली नाही? असा सवाल यावेळी उपस्थित केला. यावेळी भारती गोडबोले, मनोज तितरमारे, नंदा नारनवरे, उज्ज्वला बोढारे, सुरेंद्र शेंडे, नाना कंभाले, वंदना पाल, शांता कुमरे, नंदा लोहबरे, बबीता साठवणे, छाया ढोले आदी सत्तापक्ष व विरोधी पक्षातील सदस्यांनी पाणीप्रश्नावर आपापल्या सर्कलमधील गाऱ्हाणी सभागृहात मांडून, पदाधिकारी व अधिकाऱ्यांना यावर तोडगा काढण्याची मागणी केली.
कुही, भिवापूर, रामटेकमध्ये एकही बोअरवेल नाही
सदस्या नंदा नारनवरे म्हणाल्या, भिवापूर तालुक्यात कुठलीच नदी, तलाव नाही. यामुळे येथील जनतेला पाण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांवर निर्भर राहावे लागते. मात्र, यानंतरही अद्यापपर्यंत भिवापूर तालुक्यात एकाही बोअरवेलच्या कामाला सुरुवात झाली नाही. शांता कुमरे म्हणाल्या, रामटेक तालुक्याच्या एसडीओंनी जि.प.कडे चुकीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यांच्या प्रस्तावात तालुक्याला पाणीटंचाई उपाययोजनेच्या अनुषंगाने कुठलीच आवश्यकता नसल्याचे दर्शविण्यात आले. मात्र, वस्तुस्थितीत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून, येथे टंचाई उपाययोजनांची कामे मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. तर तितरमारे म्हणाले की, निम्मा उन्हाळा संपुष्टात येऊनही कुही तालुक्यात एकाही बोअरवेलचे काम सुरू झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Water burnt in the general meeting of Nagpur ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.