आणखी आठ दिवस जलसंकट
By admin | Published: March 3, 2015 01:38 AM2015-03-03T01:38:40+5:302015-03-03T01:38:40+5:30
नवेगाव खैरी बांधाचा उजवा कालवा फुटल्याने आणि त्याचे काम कासवगतीने
उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे
काम कासवगतीने
नागपूर : नवेगाव खैरी बांधाचा उजवा कालवा फुटल्याने आणि त्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दुरुस्तीचे काम पाहता पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण व मध्य नागपूरचा पाणीपुरवठा १० मार्चपर्यंत बाधित राहणार आहे.
गेल्या २५ फेब्रुवारी रोजी नवेगाव खैरी बांधाचा उजवा कालवा हा बांधापासून २३ किलोमीटर अंतरावर फुटला. या कालव्याच्या दुरुस्तीचे काम २७ फेब्रुवारी रोजी पाटबंधारे विभागाने हाती घेतले. त्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दुरुस्तीचे काम ठप्प झाले आहे. आता हे काम कधी पूर्ण होणार व उजव्या कालव्यातून होणारा पाणीपुरवठा कधी पूर्ववत होणार, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
२५ फेब्रुवारी रोजी पडलेली फूट ही गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठी क्षति असून, कालव्याच्या दोन्ही बाजूला सुमारे १०० फूट इतकी या फुटीची लांबी आहे. यानंतर नवेगाव खैरी बांधाचे दरवाजे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता बंद करण्यात आले. यामुळे गोरेवाडा तलावातील पातळी सतत घटत असून, जलशुद्धीकरण केंद्राच्या पंपिंगवर त्याचा परिणाम होण्यास व त्यामुळे शहराला होणाऱ्या शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यात घट होत आहे.
गोरेवाडा जलाशयातून शहराला ६५ टक्के पाणी पुरवले जाते. पाटबंधारे विभागाच्या नवेगाव खैरी बांधाच्या उजव्या कालव्याच्या जर्जर अवस्थेमुळे व वारंवार हा कालवा फुटल्यामुळे तलावातील पाण्याची पातळी पुन्हा ३१५.०८ वरून ३१३.९० मीटर इतकी कमी झाली आहे. जलाशयाच्या पातळीत होणाऱ्या सततची घट यामुळे गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्राला व परिणामी पश्चिम, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण व मध्य नागपूरला होणारा पाणीपुरवठा १० मार्चपर्यंत बाधित राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
मनपा-ओसीडब्ल्यूची दिलगिरी
गेल्या वर्षी ३१ आॅक्टोबर रोजी उजवा कालवा निंबा गावाजवळ फुटला होता. त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी बाभूळखेडा गावाजवळ पुन्हा एकदा हा कालवा फुटला होता. या सर्व परिस्थितीत ओसीडब्ल्यू व मनपाचे तज्ज्ञ त्यांच्यापरीने नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गैरसोयीबाबत मनपा ओसीडब्ल्यूतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.