अखेर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनात पाणी पोहोचले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:09 AM2021-05-26T04:09:27+5:302021-05-26T04:09:27+5:30
भिवापूर : प्रकल्पग्रस्त मुक्कामी असलेल्या किन्ही (कला) या पुनर्वसित गावात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे येथील उपसरपंचाने सोमवारी आंदोलन छेडले ...
भिवापूर : प्रकल्पग्रस्त मुक्कामी असलेल्या किन्ही (कला) या पुनर्वसित गावात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे येथील उपसरपंचाने सोमवारी आंदोलन छेडले होते. दरम्यान, पाण्याचा तिढा सोडविण्यासाठी आंदोलनस्थळी आलेल्या व्हीआयडीसी व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना कागदी घोड्यांमुळे घाम फुटला. मात्र तिढा सुटला नाही. अखेरीस महावितरणने एक पाऊल पुढे टाकत विद्युत पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरू केला आणि प्रकल्पग्रस्तांच्या तहानलेल्या वस्तीत पाणी पोहोचले. किन्ही (कला) पुनर्वसनात हॅन्डपंप, विहीर आदी पाण्याचे स्रोत बंद अवस्थेत आहे. अशात केवळ एका बोअरवेलवरून पाणी पुरवठा सुरू होता. अशातच थकीत विद्युत बिलामुळे महावितरणने मार्च महिन्यात विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची पाण्यासाठी भटकंती सुरू होती. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे येथील उपसरंपच रोशन गायधने यांनी सोमवारी तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन छेडले होते. दरम्यान, आंदोलनस्थळी आलेले व्हीआयडीसी व पंचायत समितीचे अधिकारी केवळ ऐकमेकांकडे बोट दाखवित जबाबदारी झटकत असल्यामुळे तिढा सुटण्याचे नाव नव्हते. तर आंदोलक उपसरपंच ‘पाणी मिळेल, तेव्हाच उठेल’ या मागणीवर ठाम होते. अखेरीस महावितरणने तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठ्याचा विद्युत पुरवठा सुरू केला. त्यानंतर नायब तहसीलदार दिनेश पवार यांनी उपसरपंच रोशन गायधने यास लिंबू शरबत पाजत उपोषण सोडवले. उपोषणस्थळाला भाजपचे नेते अविनाश चिमुरकर, सामाजिक कार्यकर्ते गुलाब जनबंधू, डुबराज गुरपुडे, जोगेंद्र सरदारे, प्रहारचे सुभाष सखारकर आदींनी भेटी दिल्यात.
दहा दिवसात स्पष्ट होणार?
पुनर्वसित गाव हस्तांतरित झाले की नाही, याबाबत व्हीआयडीसी व पंचायत समिती प्रशासनात एकवाक्यता नाही. त्यामुळे पुनर्वसनातील समस्यांबाबत केवळ एकमेकांकडे बोट दाखविणे सुरू आहे. या प्रकारामुळेच विद्युत बिल थकीत राहिले. त्यामुळे येत्या १० दिवसांत पुनर्वसनाच्या हस्तांतरणाची बाब स्पष्ट करून देण्यात येईल. शिवाय किन्ही (कला) पुनर्वसन येथे नवीन हॅन्डपंपची व्यवस्था करून देणार असल्याचे आश्वासन खंडविकास अधिकारी माणिक हिमाने यांनी उपसरपंच रोशन गायधने यांना दिले आहे.
===Photopath===
250521\img_20210525_165025.jpg
===Caption===
उपोषनकर्ता उपसरपंच रोशन गायधने यांना लिंबू शरबत पाजतांना नायब तहसीलदार दिनेश पवार