नागपुरातील काचीपुरा वस्तीत घरोघरी पाणी सिमेंट रोडमुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 07:37 PM2022-07-19T19:37:57+5:302022-07-19T19:38:51+5:30

Nagpur News नागपुरातील काचीपुरा वस्तीत पावसाचे पाणी शिरल्याने येथील घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.

Water from house to house in Kachipura settlement in Nagpur due to cement road obstructing water drainage |  नागपुरातील काचीपुरा वस्तीत घरोघरी पाणी सिमेंट रोडमुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळे

 नागपुरातील काचीपुरा वस्तीत घरोघरी पाणी सिमेंट रोडमुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळे

Next
ठळक मुद्देड्रेनेज सिस्टीम कचऱ्याने बुजलेली पावसाळ्यात रस्त्यावर साचतात तळे

नागपूर : काचीपुरा वस्ती रामदासपेठ भागातील अतिशय जुनी वस्ती वस्ती. परराज्यातून व्यवसायासाठी आलेल्या लोकांनी या वस्तीत निवारा शोधला. आता ते नागपूर शहराचेच रहिवासी झाले. छोट्याछोट्या घरांमध्ये कुटुंब घेऊन वर्षानुवर्षे वास्तव्य करीत असलेल्या या वस्तीतील लोकांच्या घरात गेल्या काही वर्षांपासून दर पावसाळ्यात पाणी शिरते. या वस्तीचा आढावा घेतला असता येथील घराघरांत पावसाच्या पाण्याची ओल आलेली आहे. मुसळधार पाऊस असेल तर रात्र रात्र जागावे लागत असल्याच्या तक्रारी येथील लोकांनी केल्या.

बजाजनगर, दीक्षाभूमी भागातून येणारे सर्व पाणी उतार असल्याने कृषिकुंज कॉलनीतून सिमेंट रोडवर साचते. काचीपुरा चौकातून बजाजनगरकडे जाणाऱ्या मार्गावर ड्रेनेजलाईन टाकण्यात आली आहे. कचऱ्यामुळे ही ड्रेनेजलाईन पूर्ण बुजलेली आहे. त्यामुळे कृषिकुंज कॉलनीतून येणारा पावसाचा लोंढा सिमेंट रोडवर थबकतो. सिमेंट रोडवर मोठे डिव्हायडर असल्याने पाणी अडून जाते आणि या रस्त्याला तळ्याचे रूप येते. २०१५ मध्ये या मार्गावर सिमेंट रोडच्या बांधकामाला सुरुवात झाली. सिमेंट रोड उंच आणि वस्त्या खाली, त्यातच उतार भाग असल्याने पाणी जाण्याचा दुसरा मार्ग नसल्याने वस्त्यांमध्येच पाणी शिरते. या वस्तीतून वाहणारा छोटा नालाही बुजल्याने पाण्याचा निचरा व्हायला दुसरा मार्गच नसल्यामुळे पाचशेवर घरांच्या या वस्तीतील अनेक घरांत पाणी शिरते.

- एका भागातील ड्रेनेज बुजली, दुसऱ्या भागात ड्रेनेजच नाही

काचीपुरा चौकातून बजाजनगरकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंट रोडच्या फूटपाथवर ड्रेनेजलाईन टाकली आहे. परंतु, ही ड्रेनेजलाईन कचऱ्यामुळे पूर्ण बुजली आहे. या फूटपाथवर गॅरेजची वाहने पार्क केलेली आहेत. रस्त्यावर कचरा टाकण्यात येतो. ड्रेनेजच्या चेंबरचे झाकण तुटलेले आहे. कृषिकुंजमधून येणाऱ्या पावसाचा विसर्गच होऊ शकत नाही. दुसऱ्या मार्गावर जुनी ड्रेनेजलाईन आहे. रस्त्याच्या बांधकामात ती बुजलेली आहे. त्यामुळे तिचा उपयोग नाही. काही गटरचे चेंबर रस्त्यावर आहे; पण गटर लाईन चोक झाली असल्याने पाण्याचा निचराच होत नाही. उलट पावसाळ्यात गटरचे पाणी बाहेर फेकले जाते.

- डिव्हायडर तोडावे लागले

जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिमेंट रोडवर पाणी साचले होते. वाहनांची रांग लागली होती. पाणी वाहून जाण्यासाठी लोकांनी डिव्हायडर फोडले. मुसळधार पाऊस झाला तर वस्तीत पाणी शिरतेच व काचीपुरा चौकदेखील जलमय होतो.

- पाण्याचा जोर वाढला की घराघरांत पाणी शिरते. घरात गुडघाभर पाणी भरलेले असते. कधी कधी तर रात्र जागून काढत पाणी फेकावे लागते. अजूनही घराच्या भिंती ओल्याच आहेत. निवडणूक असली की नेते मत मागायला येतात; पण अशा परिस्थितीत आम्ही जगत असताना कुणी बघायलाही येत नाही.

भागीरथी वर्मा, रहिवासी

- पावसाचेच नाही तर गटर लाईनचे देखील पाणी घरात शिरते. पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी चेंबर बनविण्याची गरज आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून येथे राहतो. सिमेंट रोड बनण्यापूर्वी पाणी रस्त्यावर साचायचे; पण घरात शिरत नव्हते. सिमेंट रोड बनल्यानंतर पावसाळ्याचा त्रास वाढला आहे.

गोमती वर्मा, रहिवासी

- रस्त्याच्या काठावर असलेल्या सर्व घरांत व दुकानांमध्ये पावसाचे पाणी भरलेले असते. बजाजनगरकडून काचीपुरा भागाकडे उतार असल्याने आणि काचीपुरा वस्ती खोलगट भागात असल्याने पाणी अख्ख्या वस्तीत शिरते. सिमेंट रोड बनण्यापूर्वी जुनी ड्रेनेज लाईन आहे, तिचा उपयोग होत नाही. वस्तीतून गेलेला नाला बुजलेला आहे. त्याला साफ केले पाहिजे. शिवाय प्रत्येक गल्लीजवळ चेंबर बनवून पावसाचा निचरा करता येऊ शकतो.

आकाश मसराम, रहिवासी

- तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचविल्यात

यासंदर्भात स्थानिक माजी लोकप्रतिनिधींना या समस्येची जाणीव आहे का? यासंदर्भात विचारणा केली असता यांनी या समस्येबाबत महापालिका प्रशासनाला अवगत केल्याचे सांगितले.

Web Title: Water from house to house in Kachipura settlement in Nagpur due to cement road obstructing water drainage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस