जोरदार पावसामुळे मेडिकल पाण्यात; शस्त्रक्रिया प्रभावित
By सुमेध वाघमार | Published: July 20, 2024 05:50 PM2024-07-20T17:50:09+5:302024-07-20T17:50:36+5:30
Nagpur : नेत्र व प्लास्टिक सर्जरी ढकलल्या पुढे
सुमेध वाघमारे
नागपूर : शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मेडिकललाही बसला. नेत्र रोग व प्लास्टिक सर्जरी विभागाच्या शस्त्रक्रिया गृहात पाणी शिरल्याने २२ च्या वर शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्यात. वॉर्ड क्र. १३ सह, स्त्री रोग व प्रसूती विभाग, बालरोग विभाग, जेरियाट्रिक ओपीडी, आकस्मिक विभाग व जनआरोग्य योजनेच्या कार्यालयातही पाणी शिरल्याने रुग्णांसह डॉक्टरांची तारांबळ उडाली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात सफाई निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना केल्या.
मेडिकलमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची ही पहिली घटना नाही. सलग चार-पाच तास मुसळधार पाऊस झाल्यास रुग्णालयात पाणी शिरते. या वर्षी पाणी शिरण्यासाठी बुजलेल्या नाल्यांसोबतच ‘स्कॉय-वॉक’ कारणीभूत ठरले. मेडिकल आणि ट्रॉमा केअर सेंटरला जोडण्यासाठी स्कॉय-वॉक तयार करण्यात आला. याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. परंतु याचे बांधकाम करताना पावसाच्या पाण्याचा विचार केला नसल्याचे दिसून येते. ‘स्कॉय-वाक’वरील पाणी नेत्ररोग विभागाचा वॉर्ड क्र. १३ मध्ये शिरले, पाण्याचा लोंढा एवढा मोठा होता की पुढे हे पाणी पायऱ्यांवरून वाहून बालरोग विभागाची ओपीडी, वृद्ध रुग्णांची जेरियाट्रिक ओपीडी, स्त्री रोग व प्रसूती विभागाची ओपडी, जुने आकस्मिक विभाग, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कार्यालयात शिरले. सकाळची वेळ असल्याने रुग्णांची फारशी गर्दी नसलीतरी डॉक्टर, परिचारिका व रुग्णांचा गोंधळ उडाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.गावंडे यांनी तातडीने उपाययोजना करून सर्वच भागातून पाणी बाहेर काढले. त्यामुळे काही वेळा नंतर पुन्हा ओपीडी सुरू झाली.
पाणी बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना
"मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी शिरले असलेतरी स्वच्छता निरीक्षक नरसिंग देवरवाड यांच्या सहकार्याने व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे तातडीने उपाययोजना करीत पाणी बाहेर काढले. यासाठी स्क्रबर ड्राय मशीनचा वापरही करण्यात आला. ज्या भागातून पाणी शिरते त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या. पाण्यामुळे कुठेही रुग्णसेवा प्रभावित झालेली नाही."
-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक मेडिकल