‘पेंच’मधून मिळणार सिंचनासाठी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:22 AM2017-09-26T00:22:32+5:302017-09-26T00:22:49+5:30
पेंच प्रकल्पाच्या पाणलोट व लाभक्षेत्रामध्ये या महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नागपूर शहरासाठी पाणी पुरवठ्याची तरतूद केल्यानंतर.....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच प्रकल्पाच्या पाणलोट व लाभक्षेत्रामध्ये या महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नागपूर शहरासाठी पाणी पुरवठ्याची तरतूद केल्यानंतर खरीप हंगामातील पिकांसाठी एका पाळीचे १५० दशलक्ष घनमीटर पाणी देणे शक्य असल्यामुळे लाभक्षेत्रातील पिकांसाठी पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी दिली.
पेंच लाभक्षेत्रातील प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाºयांसोबत जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी समन्वय साधून एक पाळी पाणी सोडण्याचा कालावधी व तारीख निश्चित करावी. त्याप्रमाणे पिकांसाठी पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्या. जिल्हा पाणी नियोजन समितीने लाभ क्षेत्रातील पिकांना एक पाळी पाणी देण्याचा निर्णय घेतला असून प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा मर्यादित असल्यामुळे शेतकºयांनी पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे व पाण्याचा अपव्यव टाळावा.
पाणी हे राष्ट्रीय संपत्ती असल्याची जाणीव ठेवून सिंचन शांततेत पार पाडून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे. पेंच प्रकल्पाच्या पाणलोट व लाभक्षेत्रामध्येजून ते आॅगस्टपर्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे तसेच मध्य प्रदेशात चौराई सिंचन प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे या प्रकल्पात अत्यल्प जलसाठा झाला आहे. त्यामुळे नागपूर शहरास पिण्याचे तसेच लाभक्षेत्रातील सिंचनाचे पाणी देण्यासाठी शाश्वत जलसाठा उपलब्ध न झाल्याने पेंचच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु सप्टेंबर महिन्यात पर्जन्यमान समाधानकारक झाल्यामुळे एक पाळीसाठी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.