दिग्गजांच्या प्रभागात पाण्याचे भांडे रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:08 AM2021-05-09T04:08:23+5:302021-05-09T04:08:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपमहापौर आणि वेगवेगळ्या समित्यांचे सभापती असणाऱ्या प्रभागात पाण्याचा ठणठणाट बघून नागरिकांच्या क्रोधाचा उद्रेक होण्याची ...

Water jars empty in veteran's ward | दिग्गजांच्या प्रभागात पाण्याचे भांडे रिकामे

दिग्गजांच्या प्रभागात पाण्याचे भांडे रिकामे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपमहापौर आणि वेगवेगळ्या समित्यांचे सभापती असणाऱ्या प्रभागात पाण्याचा ठणठणाट बघून नागरिकांच्या क्रोधाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोपाळकृष्णनगरात नळाला पाणीच नाही. आजूबाजूच्या परिसरात मुबलक पाणी येत असताना, याच भागात कोणती समस्या आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

पूर्व नागपुरातील वाठोडा प्रभाग २६ मध्ये येणाऱ्या गोपाळकृष्णनगर, शक्तिमातानगर, शेषनगर या बाजूबाजूच्या परिसरात माजी उपमहापौर मनीषा कोठे, झोन सभापती समिता चकोले, परिवहन सभापती बंटी कुकडे राहतात, तर विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम हिवरीनगर येथे राहतात. हे सगळेच नगरसेवक एकाच पट्ट्यात राहत असताना परिसरातील मूलभूत समस्या दूर करण्यासाठी कोणतेच प्रयत्न होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरात सर्वत्र नळाला उत्तम पाणी, कुठे दिवसातून तीन तर कुठे २४ तास पाणी येत असताना या भागात अजूनही दिवसातून एक तास पाणी येते. विशेष म्हणजे, नळाला पाण्याची धार इतकी बारीक असते की पिण्याच्या पाण्याचे चार भांडेही धड भरले जात नाही. अंघोळीसाठी, धुणीभांडीसाठी पाणी भरणार कुठून, हा प्रश्न येथे असतो. २४ बाय ७ च्या योजना या पोकळ बाता असल्याचे स्पष्ट होत आहे. पाणी येत नसले तरी बिल मात्र अखंडित येते. त्यामुळे आता येथील नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

-----------------

तक्रारी केल्या, मोर्चे नेले मात्र काहीच झाले नाही. नगरसेवक नळ लाईन बदलत असल्याचे सांगतात. मात्र, वर्षभरापासून ते काम झालेले दिसत नाही. उन्हाळ्यातही पाणी मिळत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.

- राजू भेंडे, सचिव, नागपूर शहर काँग्रेस कमिटी

--------------

नाव मोठे दर्शन खोटे, अशी प्रभागाची स्थिती आहे. चारही नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे आणि पाणीटंचाई दूर करण्याचे प्रयत्न करत नाहीत. भर उन्हाळ्यात पाणी पेटण्याची शक्यता आहे.

- राजेश पौनीकर, ब्लॉक अध्यक्ष, काँग्रेस कमिटी

----------------

पाणी आले तर बिल भरण्यास त्रास होणार नाही. मात्र, पाणी येथे थेंब थेंब आणि बिल मात्र लाटेप्रमाणे, अशी स्थिती आहे.

- मधुकर कडूकर, नागरिक

----------------

वेळ झाली की नळाचा मोठा आवाज येतो. असे वाटते की आज भरपूर पाणी येईल. मात्र, तो आवाज हवेच्या दाबाचा असतो.

- विक्की डुंबरे, नागरिक

.......................

Web Title: Water jars empty in veteran's ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.