कन्हानचे पाणी बोगद्याद्वारे तोतलाडोहला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:30 AM2019-06-28T00:30:00+5:302019-06-28T00:30:02+5:30
मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पासंबंधात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कन्हान नदीतील १० दलघमी पाणी बोगद्याद्वारे तोतलाडोह जलाशयात वळविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल २ हजार ८६४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा ऐतिहासिक निर्णय असून नागपूर शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पासंबंधात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कन्हान नदीतील १० दलघमी पाणी बोगद्याद्वारे तोतलाडोह जलाशयात वळविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल २ हजार ८६४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा ऐतिहासिक निर्णय असून नागपूर शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
जलसंपदा विभागातर्फे मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावाजवळून कन्हान नदीतून हा बोगदा तयार केला जाणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व या भागातील आमदारांनी दीर्घ काळापासून ही मागणी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जलसंधारण मंत्री असताना या प्रश्नाची दखल घेत बैठकाही घेतल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा केला होता. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीयावर निर्णय घेत दिलासा दिला आहे.
सन २०१६-१७ मध्ये मध्यप्रदेश सरकारने चौराई धरणाचे बांधकाम पूर्ण केले. त्यामुळे पेंच नदीवरील तोतलाडोह धरणात पाणी येणे कमी झाले आहे. तेव्हापासून नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेनासे झाले व नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. चौराई धरणामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या ६१४ दलघमी पाण्यात घट झाली. १९६४ च्या पाणी वापरासाठी करण्यात आलेल्या आंतरराज्यीय पाणी वापर करारानुसार मागील ४० वर्षात महराष्ट्राला १८४० दलघमी पाणी मिळवयास हवे होते. ते फक्त १२९४ दलघमी मिळाले. चौराई धरण होईपर्यंत गेल्या २५ वषार्पासून नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणात येणाऱ्या सर्व पाण्याचा वापर होत होता. त्यातून नागपूर शहरासाठी पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. पण आता त्यात ६१४ दशलक्ष घनमीटरची तूट निर्माण झाली आहे.
चौराई धरण मध्य प्रदेशात बांधण्यात आल्यामुळे पूर्वी प्राप्त होणाऱ्या ४२.७ टीएमसीपैकी फक्त २७ टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या तोतलाडोह येथे उपलब्ध होत होते. ही तफावत भरून काढण्यासाठी २५ ऑक्टोबर २०१६ रोजी गठित समितीच्या शिफारशीनुसार व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कमी कालावधी व दीर्घ कालावधीत पूर्ण होऊ शकणाऱ्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. गेल्या ३० मे २०१९ च्या शासन निर्णयानुसार मंजूर योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतर ११८ दलघमी पाण्याची तूट भरून निघणे अपेक्षित आहे. पण नागपूर शहराची २०२५ पर्यंत लोकसंख्येतील वाढ लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची मागणी २५० ते ३०० दलघमी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मंजूर उपाययोजना पूर्ण झाल्यानंतरही मनपाच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता व एक लाख चार हजार हेक्टर सिंचन होणे कठीण होते.
६२ किमीचा असेल बोगदा
नागपूरजवळील जामघाट प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या वन जमिनीमुळे अव्यवहार्य ठरला आहे. यामुळे लोहघोगरी गावाजवळ वळण बंधारा बांधून बोगद्याद्वारे कन्हान नदीचे पाणी तोतलाडोह धरणात वळवण्यात येणार आहे. या बंधाऱ्याची लांबी १६० मीटर व उंची ५.५ मीटर राहणार आहे. तर बोगद्याची लांबी ६२ किमी राहणार आहे. या बोगद्याचा व्यास ६.९ मीटर असेल. १२.२६ हेक्टर वनजमिनी यासाठी लागणार असून १० दलघमी पाणी वळवण्यात येणार आहे.
असा मिळेल निधी
बोगद्याद्वारे तोतलाडोहमध्ये पाणी आणण्याच्या प्रकल्पाला सन २०१९-२० मध्ये ५८६ कोटी सन २०२०-२१ मध्ये ५७५ कोटी, २०२१-२२ मध्ये ५७४ कोटी, सन २०२२-२३ मध्ये ५७४ कोटी व सन २०२३-२४ मध्ये ५५४ कोटी रुपये मिळून २८६४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
असे आहेत फायदे
- जलसाठा १० दलघमीने वाढणार
- चौराई धरणामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई दूर होणार
- नागपूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार
- पेंच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात झालेली घट भरून निघण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल.
- पाच वर्षात प्रकल्प पूर्ण होणार, एक लाख हेक्टर सिंचन वाढेल
- तोतलाडोह येथे कार्यान्वित असलेले जलविद्युत प्रकल्पातून सरासरी ९५ दशलक्ष युनिट वीज अधिक निर्माण होईल.