नागपूरनजिकच्या कन्हान नदीचा जलस्तर उन्हाळ्यापूर्वीच घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:19 AM2018-02-09T11:19:58+5:302018-02-09T11:21:08+5:30
अद्याप उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात कन्हान नदीचा जलस्तर घटला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अद्याप उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात कन्हान नदीचा जलस्तर घटला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या मोजमापानुसार बीणा संगम येथे नदीचा प्रवाह १२९ एमएलडी इतका होता. या प्रवाहात कन्हान जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य नाही. यामुळे उत्तर व पूर्व नागपूरचा पाणीपुरवठा सकाळीदेखील बाधित राहिला. ही परिस्थिती आणखी काही दिवसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात पूर्व विदर्भ व पेंन नदीच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊ स झाला. त्यातच तोतलाडोहच्या वरील भागात मध्यप्रदेशात चौराई धरण बांधण्यात आले आहे. यामुळे तोतलाडोह प्रकल्पात ३० टक्केच जलसाठा शिल्लक आहे.
यामुळे अचानक पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या उन्हाळ्यात पाण्याची संभाव्य वाढीव मागणी लक्षात घेऊ न महापालिका व ओसीडब्ल्यू यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना अतिरिक्त पाणी कन्हान नदीमध्ये सोडण्याची विनंती केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने उजव्या कालव्यातून ५० क्युसेक पाणी सोडले आहे. नदीत सोडलेले हे पाणी उजव्या कालव्याच्या एस्केप गेटमधून ३२ किमी प्रवास करून ७२ तासांत म्हणजेच रविवारी १० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता कन्हान इनटेक वेल येथे पोहचेल. या काळात नियंत्रित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून उत्तर व पूर्व नागपूरला कमीत कमी त्रास होईल.
कालव्यात सोडलेले पाणी कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता ७२ तासांत इनटेक वेलपर्यंत पोहचावे यासाठी महापालिका व ओसीडब्ल्यू यांनी पाहणी सुरू केली आहे. कन्हान जलशुद्धीकरण येथे नदीचा प्रवाह पूर्णपणे इनटेक वेलकडे वळवण्यात आलेला आहे व तात्पुरता बंधारा बांधण्यात आला आहे .जेणेकरून उपलब्ध पाणी वाहून जाणार नाही. यासाठी जलसंपदा विभागाच्या उजव्या कालव्यात रेतीची पोती टाकलेली आहे. या पोत्यांमुळे सोडण्यात आलेले पाणी एस्केप गेटकडे वळवण्याला मदत होईल.