नर्सिंग वसतिगृहातील ‘वॉटर फिल्टर’चेच पाणी दूषित, धक्कादायक अहवाल समोर

By सुमेध वाघमार | Published: July 18, 2023 04:36 PM2023-07-18T16:36:00+5:302023-07-18T16:38:36+5:30

मेडिकल : मुलींच्या व डेंटलच्या वसतिगृहातील पाणी पिण्यालायक नाही

water of the 'water filter' in Medical nursing hostel is contaminated | नर्सिंग वसतिगृहातील ‘वॉटर फिल्टर’चेच पाणी दूषित, धक्कादायक अहवाल समोर

नर्सिंग वसतिगृहातील ‘वॉटर फिल्टर’चेच पाणी दूषित, धक्कादायक अहवाल समोर

googlenewsNext

नागपूर : मेडिकल नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थिनीचा अचानक मृत्यूमागे सुरूवातीला ‘गॅस्ट्रोएन्टेरायटीस’ आणि नंतर ‘विषमज्वर’ आजार असल्याचे सांगण्यात येते. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच आजार स्पष्ट होणार आहे. परंतु खळबळ उडवून दिलेल्या या घटनेनंतर मनपाच्या आरोग्य विभागाने वसतिगृहातील पाण्याचे नमुने तपासले असता ‘वॉटर फिल्टर’मधील पाणी दूषित असल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.

नर्सिंग कॉलेजच्या बी.एससी. प्रथम वर्षाला असलेल्या १८ वर्षीय शितलने पाणीपुरी खाल्ली होती. लक्षणे दिसून येताच तीनच दिवसांत तिचा मृत्यू झाला. आजाराचे निदान करण्यास व उपचारातही उशीर झाल्याचे बोलले जाते. सुरूवातीला डॉक्टरांनी ‘गॅस्ट्रोएन्टेरायटीस’ असल्याचे सांगितले, मात्र आता ‘विषमज्वर’ असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेला मनपाच्या आरोग्य विभागाने गंभीरतेने घेतले. त्यांच्यानुसार, मेडिकलच्या परिसरात असलेल्या नर्सिंग कॉलेजमधील ‘वॉटर फिल्टर’ लागलेल्या एका वॉटर कुलरमधून व पाण्याचा टाकीतून असे दोन नमुने घेतले. त्यातील ‘वॉटर फिल्टर’मधील पाणी दूषित असल्याचा अहवाल प्राप्त झाला.

- तीन वसतिगृहातील पाणी दूषित

नर्सिंग कॉलेजसोबतच मनपाने मार्ड वसतिगृह, ‘एलएच-१’, ‘एलएच-६’ हे दोन मुलींचे वसतिगृह, ‘एलएच-२’ व ‘एलएच-३’ हे मुलांचे वसतिगृह आणि शासकीय दंत महाविद्यालयाचे (डेंटल) वसतिगृह येथीलही पाण्याचे नमुने घेतले. यातील ‘एलएच-१’, ‘एलएच-६’ हे दोन मुलींच्या वसतिगृहातील व ‘डेंटल’ वसतिगृहातील पाणी पिण्यालायक नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. याची माहिती संबंधित वसतिगृहांना देण्यात आली असल्याचे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी सांगितले.

-‘वॉटर फिल्टर’ बदलण्यात आले 

मनपाने पाण्याचे नमुने तपासून दिलेल्या अहवालानुसार एका वॉटर कुलरमधील पाणी दूषित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. खबरदारी म्हणून चारही वॉटर कुलरचे ‘वॉटर फिल्टर’ बदलण्यात आलेले आहे. 

- ज्योती घायवट, प्राचार्य, नर्सिंग कॉलेज, मेडिकल

- काही दिवसांपूर्वीच पाण्याची टाकी स्वच्छ केली

डेंटल कॉलेजच्या वसतिगृहातील पाण्याची टाकी काही दिवसांपूर्वीच स्वच्छ केली. सोबतच सर्वच ठिकाणातील ‘वॉटर फिल्टर’ बदलण्यात आले आहे. यामुळे काळजीचे कारण नाही.

- डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता डेंटल कॉलेज

Web Title: water of the 'water filter' in Medical nursing hostel is contaminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.