मुसळधार पावसाने रुळावर पाणी, अनेक रेल्वेगाड्यांना 'रेड सिग्नल'; प्रवाशांची मोठी गैरसोय
By नरेश डोंगरे | Published: July 9, 2024 12:24 AM2024-07-09T00:24:52+5:302024-07-09T00:25:29+5:30
गेले दोन दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार अतिवृष्टी झाली
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मुंबईसह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस आल्याने चक्क रेल्वे लाईनवर पाणी साचले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सेवाग्राम एक्स्प्रेस, दुरंतोसह अनेक गाड्यांना रेड सिग्नल देण्यात आला. काही गाड्यांचे शेड्युल बदलण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होत आहे.
रविवारी राज्याच्या अनेक भागात जोरदार अतिवृष्टी झाली. त्यामुळे मुंबईसह ठिकठिकाणच्या रेल्वे लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ते ध्यानात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने १२१०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोंदिया एक्स्प्रेस रात्री ८:५ वाजता, ११४०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बल्लारशाह एक्स्प्रेस रात्री ९:४५ वाजता, १२३२२ छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस (८ आणि ९ जुलै) मध्यरात्री १२:४५ वाजता, १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालीमार एक्स्प्रेस (८ व ९ जुलै) रात्री १२:०५ वाजता सोडण्यात आली. त्याचप्रमाणे नागपूर मार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. या एकूणच प्रकारामुळे प्रवासाची तयारी करून रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या अनेक प्रवाशांचे, त्यांच्या नातेवाईकांचे मोठे हाल झाले.
-------------
सिकंदराबाद मार्गावरील अनेक गाड्या रद्द
सिकंदराबाद रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे गाड्यांची लेटलतिफी सुरू आहे. हा प्रकार रेल्वे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप देणारा ठरला आहे.