‘ट्रायल’विना निवडली ‘वॉटर पोलो’ चमू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:59 AM2018-10-26T10:59:58+5:302018-10-26T11:00:28+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत ‘वॉटर पोलो’ चमूच्या निवड प्रक्रियेच्या मुद्यावरून जोरदार गोंधळ झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत ‘वॉटर पोलो’ चमूच्या निवड प्रक्रियेच्या मुद्यावरून जोरदार गोंधळ झाला. सदस्यांनी कुलगुरूंवर अक्षरश: प्रश्नांचा वर्षावच केला. कुलगुरूंनी कुठल्या अधिकारात ‘ट्रायल’ न घेताच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होण्याची १३ सदस्यीय संघाला परवानगी कशी काय दिली व ‘ट्रायल’ दिलेल्या तीन खेळाडूंना कोणत्या आधारावर चमूत सहभागी करण्यास नकार देण्यात आला, असा प्रश्नदेखील उपस्थित केला.
या मुद्यावर सभागृहाचे वातावरण तापले होते. चमूतील खेळाडूंचे हित लक्षात घेता विशेषाधिकारांतर्गत १३ सदस्यीय चमूला मंजुरी दिली. या खेळाबाबत मला काहीही माहिती नाही. खेळाडूंचे एक प्रतिनिधीमंडळ भेटले होते. त्यांचे म्हणणे होते की, विद्यापीठाच्या ‘वॉटर पोलो’च्या निवड समितीने खेळ न पाहताच संपूर्ण चमूला नाकारले; सोबतच राष्ट्रीय स्पर्धेत चमूला पाठविण्यास नकार दिला. हीच चमू मागील वर्षी चंदीगड येथे आयोजित ‘वॉटर पोलो’स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचली होती, अशी भूमिका खेळाडूंनी मांडल्याचे कुलगुरूंनी सांगितले. यासंबंधात विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. कल्पना वसंत जाधव यांच्याकडून माहिती मागविण्यात आली होती. समितीने २६ खेळाडूंची ‘ट्रायल’ घेतली होती. यातील एकही खेळाडू योग्य नसल्याचा निर्वाळा समितीने दिला असल्याची बाब यानंतर समोर आली. डॉ. जाधव यांच्याकडून माहिती मिळताच १३ सदस्यीय चमूला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
संबंधित चमूची ‘फिटनेस टेस्ट’ घेण्यात आली होती का आणि जर खेळाडूंना काही झाले तर याची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न अॅड. मनमोहन वाजपेयी यांनी उपस्थित केले.
चमूत समाविष्ट होणार ‘ते’ तीन खेळाडू
‘ट्रायल’दरम्यान तीन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. मात्र त्यांना जाणूनबुजून चमूमध्ये सहभागी करण्यात आले नाही, असा खुलासादेखील अॅड. वाजपेयी यांनी केला. प्रदीर्घ चर्चेनंतर कुलगुरूंनी तीन खेळाडूंना चमूमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली. या खेळाडूंना त्वरित पाठविण्यात यावे, तसेच स्पर्धेच्या आयोजकांना खेळाडूंची सुधारित यादी पाठविण्यात यावी, असे निर्देश त्यांनी संचालक डॉ. जाधव यांना दिले.